अकोला : पाणीपुरी... जवळपास सर्वांचाच विक पाँईंट... सर्वांना हवाहवास वाटणारा खाद्यपदार्थ... मात्र अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये पाणीपुरी खाण्यासाठी दहावीतल्या विद्यार्थ्याने चक्क सायकल्स चोरल्याचा प्रकार समोर आला आहे.

पाणीपुरी... नाव ऐकलं तरी खाण्याची इच्छा होते... पोट भरलं, तरी मन न भरणारा जिन्नस... मात्र याच पाणीपुरीच्या प्रेमापोटी अकोल्यातल्या अकोटमध्ये चक्रावून टाकणारा प्रकार घडला. दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने पाणीपुरी खाण्यासाठी चोरी करायला सुरुवात केली.

या विद्यार्थ्यांना पाणीपुरी खाण्याचा शौक जडला. एका दिवशी तो 40-50 रुपयांची पाणीपुरी खायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यासाठी त्याने एक-दोन नाही तर तब्बल 8 सायकली चोरल्या.

शाळा-महाविद्यालय, क्लासेस परिसरातून सायकल चोरायची... ती विकायची... आलेल्या पैशांतून पोटभरुन पाणीपुरी खायची अन मित्रांनाही खाऊ घालायची.

मुलाच्या कारनाम्याबद्दल पालकांना खबरही नव्हती. पोरानं झाडावरचे पेरु चोरण्याच्या वयात सायकल चोरली. तुमची पोरं पाणीपुरीपायी काही आगळीक तर करत नाहीत ना? याकडे पालकांनी वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.