बीड : 'एबीपी माझा' वृत्तवाहिनीचे पत्रकार आणि कॅमेरामन असल्याचं भासवून खंडणी मागणाऱ्या टोळीचा बीडमध्ये पर्दाफाश करण्यात आला आहे. बनावट पत्रकारांपासून सावध राहण्याचं आवाहन 'एबीपी माझा'तर्फे करण्यात येत आहे.


बीडमध्ये पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गड येथील मठाधिपती विठ्ठल महाराज यांना ब्लॅकमेल करुन खंडणी मागणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. एका व्हिडिओ क्लिपवरुन काही व्यक्ती मठाधिपती विठ्ठल महाराज यांना सतत फोन करुन धमक्या देत होते आणि पैशांची मागणी करत होते. या प्रकरणी अंमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला जाणार आहे.

गहिनीनाथ गडाच्या मठाधिपतींना पैसे द्या, अन्यथा परिणामांना सामोरे जा, अशी धमकी येत होती. मठाधिपतींनी दहा लाख रुपये दिले होते. यानंतर पुन्हा वाढीव खंडणीची मागणी होऊ लागली. त्यानंतर मठाधिपतींनी पोलिसांना हा प्रकार सांगितला.

पोलिसांनी ब्लॅकमेलिंग करणाऱ्या टोळीला पकडण्यासाठी सापळा रचला. मात्र पहिल्या वेळी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात आले नाहीत. तरीही मठाधिपतींना खंडणीबाबत फोन येण्याचा प्रकार सुरुच होता. यानंतर शनिवारी आठ लाख रुपये देण्याचं फोनवरुन ठरलं. पोलिसांनी सापळा रचला आणि बनावट पत्रकारांना रंगेहाथ पकडलं.