RSS Ram Madhav : काफीर, जिहाद या संकल्पना आता मुस्लिमांनी सोडल्या पाहिजेत. संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि माजी प्रवक्ते राम माधव यांनी मुस्लिम समाजाला आवाहन केलं. ते अकोला येथील भिकमचंद खंडेलवाल महाविद्यालयात झालेल्या संघाच्या विजयादशमी उत्सवात मुख्य वक्ते म्हणून बोलत होते. आपल्या ईश्वरासोबतच इतर धर्मियांच्या धार्मिक भावनांचा आदर मुस्लिमांनी ठेवावा असं आवाहनही त्यांनी मुस्लिमांना केलंय. सरसंघचालकांचा संवाद त्यासाठीच असल्याचं स्पष्टीकरणही यावेळी त्यांनी दिलं. सरसंघचालकांनी दिल्लीत मशिदीला भेट दिल्यानंतर संघाचं प्रथमच मुस्लिमांना जाहीर आवाहन.
मुस्लिम एकच देव असल्याचं सांगतात. तो देव अल्ला असल्याचं ते म्हणतात. देव हा एकच देव असल्याचं आम्हीही मानतो. मात्र, आम्ही त्याची वेगवेगळ्या रूपांत पुजा करतो. मुस्लिम देव एकच असल्याच्या विचारांचं भारतीयीकरण झालं पाहिजे. आम्ही अनेक रूपात देवांचं पुजन करतो, त्यांना मानतो, हे मुस्लिमांनीही मानलं पाहिजे. आमचं मुस्लिमांशी धर्माबाबत कोणतंही भांडण नाहीय. बाकीच्या देवांची पुजा करणार्यांना तुम्ही काफीर मानता. मुस्लिम समाजानं काफीर, जिहाद हे विचार सोडले पाहिजेत. याच गोष्टींसंदर्भात संवाद घडावा म्हणून सरसंघचालकांचे प्रयत्न. ते या लोकांना भेटतात. संवाद कोणत्याही समझोत्यासाठी नाहीये, तो आपण एका सुत्रात बांधले जावोत यासाठी आहे, असे राम माधव म्हणाले.
संघ 100 वर्षांचा होत असतांना विरोधकांशीही संवाद कायम ठेवावा लागेल. संघाला व्यापक करण्याचे पुढच्या काळातील प्रयत्नाचे राम माधव यांच्याकडून सुतोवाच. जीडीपीत पुढे असणारा देश व्यक्तीच्या वैयक्तिक उत्पन्नात मागे का?. पुढील काळात संघ यावरही काम करणार असल्याचे राम माधव म्हणाले.
कलम 370 वरून राम माधव यांची पंडीत नेहरूंवर टीका केली. 1946 मध्ये नेहरूंकडे काही नेते गेले होते. त्यांनी नेहरू़ंना कलम 370 हटविण्याची विनंती केली होती. त्यांनीही हे कलम हटविण्याची आवश्यकता बोलली होती. परंतू त्यांनी आताच त्याची वेळ नसल्याचं म्हटलं होतंय. त्यानंतर देशाच्या एकात्मतेवर डाग असणारं कलम 370 हटवायला 70 वर्ष लागलीत. ते कलम हटविणारे लोक संघ विचारांतून समोर आलेले आहेत, असे राम माधव म्हणाले.
अयोध्येत आपल्यावर डाग असणारी वास्तू हटवून तिथं भव्य राममंदिर उभं राहण्याचं स्वप्नंही संघ विचारांतून पुढे आलेल्या लोकांनी पूर्ण केलंय, असे म्हणत राम माधव यांनी मोदी सरकारवर स्तुतीसुमनं उधळली. संघावर सांप्रदायिकतेचा आरोप करणारे लोक आता हिंदुत्वावर पुस्तकं लिहायला लागलीत. आता ते काँग्रेसचे अध्यक्ष व्हायला लागलेत. ते आता आपण किती कट्टर हिंदू आहोत हे लोकांना सांगायला लागलेत, असे म्हणत राम माधव यांनी काँग्रेस खासदार शशी थरूर यांना टोला लगावला.. संघ नेहमी संवादाच्या भावनेवर विश्वास ठेवतो. 100 वर्ष ज्यांना आम्हाला शिव्या दिल्यात. आज तेच बाजूला झालेत. संघ विरोधकांना राम माधव यांनी टोला लगावला.