Akola Panchayat Samiti election Update: अकोला जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती-उपसभापतीपदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनं जोरदार मुसंडी मारली आहे. जिल्ह्यातील सातपैकी तब्बल चार पंचायत समित्यांवर वंचित बहुजन आघाडीनं सत्ता स्थापन केली आहे. तर भाजपनं अकोला आणि बार्शीटाकळी पंचायत समितीवर आपला झेंडा फडकवला आहे. तर भाजपच्या मदतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं अकोट पंचायत समितीवर आपला भगवा फडकवला आहे.
आज अकोला जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या सभापती-उपसभापती पदाची निवडणूक पार पडली. वंचितचं संपुर्ण बहूमत असलेल्या अकोला पंचायत समितीवर भाजपला लॉटरी लागली. येथे अनुसुचित जमाती महिलेसाठी राखीव असलेल्या सभापतीपदाचा उमेदवार फक्त भाजपकडेच असल्यानं भाजपच्या सुलभा सोळंके अविरोध सभापती झाल्यात. मुर्तिजापूर, पातूर, बाळापूर, तेल्हारा या पंचायत समित्याही वंचितकडे गेल्या आहेत. मागच्यावेळी शिवसेनेकडे असलेली पातूर पंचायत समितीही वंचितनं ईश्वरचिठ्ठीत आपल्याकडे खेचून घेतली. अकोट आणि बार्शीटाकळीमध्ये भाजपनं महाविकास आघाडीला साथ दिली आहे. अकोटमध्ये भाजपच्या साथीनं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सभापती झालाय. तर बार्शीटाकळीत शिवसेनेच्या बंडखोर सुनंदा मानतकार यांनी ऐनवेळी भाजपात प्रवेश करीत सभापतीपद पटकावलं आहे. येथे सेना, काँग्रेस, राष्ट्रवादीनंही भाजपला मतदान केलंय. तर मुर्तिजापूरात महाविकास आघाडीत बिघाडी होत उद्धव ठाकरेंच्या सेनेने वंचितला पाठींबा देत उपसभापती मिळवलं आहे.
जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांंमध्ये नेमकी कशी सत्ता समीकरणं रंगलीत?, हे सांगणारं 'एबीपी माझा'च हे खास विश्लेषण.
अकोला पंचायत समितीत भाजपला 'लॉटरी' :
वंचितचं संपुर्ण बहूमत असलेल्या अकोला पंचायत समितीवर भाजपला लॉटरी लागली. येथे अनुसुचित जमाती महिलेसाठी राखीव असलेल्या सभापतीपदाचा उमेदवार फक्त भाजपकडेच असल्यानं भाजपच्या सुलभा सोळंके अविरोध सभापती झाल्यात. तर उपसभापतीपदी वंचित बहुजन आघाडीचे अजय शेगांवकर यांचीही अविरोध निवड झाली. त्यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या शिवसेनेच्या भास्कर अंभोरेंनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शेगांवकर अविरोध विजयी झाले आहेत. अकोला पंचायत समिती ही जिल्ह्यातील सर्वात मोठी पंचायत समिती आहे. मात्र, काठावरचं बहूमत असलेल्या वंचितकडे सभापती पदासाठी राखीव प्रवर्गातील उमेदवार नसल्यानं भाजपला येथील सत्तेची 'लॉटरी' लागली आहे.
अकोला पंचायत समिती सभापती/उपसभापती :
सभापती : सुलभा सोळंके : भाजप
उपसभापती : अजय शेगांवकर : वंचित
अकोला पंचायत समिती पक्षीय बलाबल :
एकूण जागा : 20
भारिप - 10
शिवसेना - 04
राष्ट्रवादी कांग्रेस - 01
भाजप - 03
अपक्ष - 02
सत्ता : भाजप
अकोटमध्ये भाजपच्या साथीनं उद्धव ठाकरेंचा सभापती :
राज्यात सध्या भाजप आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मोठा राजकीय संघर्ष सुरू आहे. मात्र, अकोटमध्ये भाजपनं आपला जुना मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेला साथ दिली आहे. अकोटमध्ये भाजपच्या साथीनं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सभापती झाला आहे. अकोटमध्ये भाजप, शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि प्रहार एकत्र आलेत. या नव्या समिकरणानं अकोटमधील वंचितची सत्ता उलथवून टाकत पंचायत समिती ताब्यात घेतली आहे. सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनोच्या उद्धव ठाकरे गटाच्या हरदिनी वाघोडे यांनी वंचितच्या सपना झासकर यांचा 9 विरूद्ध 7 मतांनी पराभव केला. तर उपसभापती पदाच्या निवडणुकीत भाजपच्या संतोष शिवरकर यांनी वंचितच्या मुमताज शहा यांचा 9 विरूद्ध 7 मतांनी पराभव केला.
अकोट पंचायत समिती सभापती/उपसभापती :
सभापती : हरदिनी वाघोडे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
उपसभापती : संतोष शिवरकर: भाजप
अकोट पंचायत समिती पक्षीय बलाबल :
एकूण जागा : 16
भारिप बहुजन महासंघ : 7
शिवसेना : 4
भाजप : 3
काँग्रेस : 1
अपक्ष : 1
सत्ता : सेना उद्धव ठाकरे-़भाजप
तेल्हारा पंचायत समितीवर वंचितचा 'झेंडा' :
तेल्हारा पंचायत समितीवर वंचित बहूजन आघाडीची एकहाती सत्ता आहे. आज झालेल्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडी अविरोध झाल्या आहेत. पंचायत समिती सभापतीपदी आम्रपाली गवारगुरू विजयी झाल्या आहेत. तर उपसभापती पदावर वंचितचेच किशोर मुंदडा अविरोध निवडून आले आहेत.
तेल्हारा पंचायत समिती सभापती/उपसभापती :
सभापती : आम्रपाली गवारगुरू : वंचित
उपसभापती : किशोर मुंदडा: वंचित
तेल्हारा पंचायत समिती पक्षीय बलाबल :
एकूण जागा : 16
भारिप बहुजन महासंघ : 09
शिवसेना : 03
भाजप : 03
काँग्रेस : 01
सत्ता : वंचित बहुजन आघाडी
पातूरमध्ये 'ईश्वरचिठ्ठी'चा 'कौल' वंचितला :
पातूर पंचायत समितीच्या सभापती-उपसभापती या दोन्ही पदांसाठी नशिबाने वंचित बहूजन आघाडीला साथ दिली. दोन्ही निवडणुकीत उमेदवारा 8-8 अशी समान मते मिळाल्याने ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. यात सभापती पदाकरिता सेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या मनीषा ढोणे आणि वंचितच्या सुनीता टप्पे यांच्यात लढत झाली. यात दोघींनाही 8-8 मते मिळालीत. यावेळी काढण्यात आलेल्या ईश्वरचिठ्ठीत सुनिता टप्पे विजयी झाल्यात. उपसभापती पदासाठी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच गोपाल ढोरे आणि वंचितचे इमरान खान यांना प्रत्येकी 8-8 मते मिळालीत. यातही वंचितलाच 'कौल' मिळत इमरान खान विजयी झालेत.
पातूर पंचायत समिती सभापती/उपसभापती :
सभापतीपदी : सविता टप्पे : वंचित
उपसभापती : इमरान खान : वंचित
पातूर पंचायत समिती पक्षीय बलाबल :
एकूण जागा : 16
भारिप बहुजन महासंघ : 05
शिवसेना : 06
अपक्ष : 01
काँग्रेस : 02
राष्ट्रवादी : 02
सत्ता : वंचित बहुजन आघाडी
बाळापूर पंचायत समिती वंचितनं राखली :
बाळापूर पंचायत समितीवर परत एकदा वंचितनं आपली सत्ता राखली आहे. सभापतीपदी वंचितच्या शारदा सोनटक्के विजयी झाल्या आहेत. त्यांनी तर उपसभापती पदावर वंचितच्याच राजकन्या कवरकार विजयी झाल्या आहेत. त्यांनी विरोधकांचा 9 विरूद्ध 5 मतांनी पराभव केला आहे.
बाळापूर पंचायत समिती सभापती/उपसभापती.
सभापती : शारदा सोनटक्के : वंचित
उपसभापती : राजकन्या कवरकार: वंचित
बाळापूर पंचायत समिती पक्षीय बलाबल :
एकूण जागा : 14
भारिप बहुजन महासंघ : 08
शिवसेना : 04
अपक्ष : 01
एमआयएम : 01
सत्ता : वंचित बहुजन आघाडी
मुर्तिजापूरात 'भिमशक्ती-शिवशक्ती'ची सत्ता. वंचित-उद्धव ठाकरे एकत्र :
राज्याच्या राजकारणात प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. मात्र, याची सुरूवात झाली ती मुर्तिजापूर पंचायत समितीत. या पंचायत समितीत उद्धव ठाकरेंनी प्रकाश आंबेडकरांच्या वंचितला साथ दिली आहे. मुर्तिजापूर पंचायत समितीच्या सभापतीपदी वंचितच्या आम्रपाली तायडे अविरोध विजयी झाल्यात. तर उपसभापतीपदावर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे देवाशिष भटकर 9 विरूद्ध 0 मतांनी विजयी झालेत. त्यांच्या विरोधातील काँग्रेस उमेदवार जया तायडे या मतदानावेळी अनुपस्थित राहिल्यात. येथे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्रं पहायला मिळालं.
मुर्तिजापूर पंचायत समिती सभापती/उपसभापती :
सभापती : आम्रपाली तायडे : वंचित
उपसभापती : देवाशिष भटकर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
मूर्तिजापुर पंचायत समिती पक्षीय बलाबल :
एकूण जागा : 14
वंचित- 06
शिवसेना - 03
राष्ट्रवादी कांग्रेस - 03
कांग्रेस - 02
सत्ता : वंचित-उद्धव ठाकरे गट
बार्शीटाकळीत मोठे 'उलटफेर'. सेना बंडखोर सभापतीपदी :
बार्शीटाकळी पंचायत समितीत मोठे उलटफेर पहायला मिळालेत. शिवसेनेच्या सुनंदा मानतकार यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश करीत सभापतीपद पटकावलं. त्यांनी वंचितच्या प्रणिता मानकर यांचा 9 विरूद्ध 5 मतांनी पराभव केला. तर उपसभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपाचे सदिप चौधरी यांनी वंचितचे रामदास घाडगे यांचा ९ विरूद्ध 5 मतांनी पराभव केला. बार्शीटाकळीत भाजप, शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आलेत.
बार्शीटाकळी पंचायत समिती सभापती/उपसभापती :
सभापती : सुनंदा मानतकार : सेना बंडखोर.
उपसभापती : संदिप चौधरी : भाजप
बार्शीटाकळी पंचायत समिती पक्षीय बलाबल :
एकूण जागा : 14
भारिप बहुजन महासंघ : 03
शिवसेना : 03
भाजप : 03
काँग्रेस : 03
राष्ट्रवादी : 01
अपक्ष : 01
सत्ता : भाजप-महाविकास आघाडी