Akola News : अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापुरात शिवसेना शिंदे गटाच्या तालुका प्रमुख दीपक पाटील दांदळेला नाशिकच्या एलसीबीने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. नाशिकच्या मालेगावात ऑक्टोबर महिन्यातील 10 लाखाच्या बनावट नोटा चलनात आणण्याचं प्रकरण समोर आलं होतं. त्यानंतर बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना मालेगाव पोलिसांनी रंगेहात पकडलं होत.
ल्या दोन तासापासून दांदळे यांची चौकशी सुरु
तपासा दरम्यान राज्यबाहेरील तसेच अमरावती जिल्ह्यातील धारणीतील युवकाचा यात समावेश होता. धारणीतील त्या संशयित युवकाच्या कॉल सीडीआर'मध्ये मूर्तिजापूरातील शिंदे शिवसेनेचे 'तालुका प्रमुख दीपक पाटील दांदळे' यांचा संपर्क दिसून आल्याने आज नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. गेल्या दोन तासापासून दांदळे यांची चौकशी सुरु आहे. दरम्यान, चौकशीनंतर दांदळे यांना नोटीस बजावून तपासकामी वेळोवेळी हजर राहण्याचे आदेश बजावले आहेत. मात्र, नाशिकच्या पोलिसांनी शिंदेसेनेच्या तालुका प्रमुखाला बनावट नोटा प्रकरणात ताब्यात घेतल्याने अकोला जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
नोव्हेंबरमध्ये मुंबई-आग्रा महामार्गावर पोलिसांनी कारवाई करत दोघा संशयितांकडून 10 लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. याप्रकरणी मध्य प्रदेशातील नाजिर अक्रम मोहम्मद अय्यूब अन्सारी (रा. मोमिनपुरा) व मोहम्मद जुबेर मोहम्मद अश्रफ अन्सारी (रा. हरीरपुरा, वॉर्ड क्र. ३१, बुरहानपूर, मध्य प्रदेश) या दोघांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर न्यायालयाने त्यांना 8 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. अपर पोलिस अधीक्षक संधू व मालेगाव ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत बाविस्कर, पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या पथकाला 29ऑक्टोबर रोजी रात्री महामार्गावर दोन इसम संशयास्पदरीत्या आढळून आले होते. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली होती. पोलिसांनी रात्री सव्वाबाराच्या सुमारास त्यांना हटकत तपासणी केली. यावेळी संशयित मोहम्मद जुबेर याच्याजवळ असलेल्या एका सॅकमध्ये 500 रुपयांच्या 8 लाख रुपयांच्या नोटा भरलेल्या आढळून आल्या. तर जोडीदाराच्या तपासणीत त्याच्या खिशात 2 लाखांच्या बनावट नोटा सापडल्या. पोलिसांनी 10 लाखांच्या बनावट नोटा व दोघांजवळून मोबाइल असा मुद्देमाल जप्त केल्या होत्या. या प्रकरणी भारतीय चलन कायदा तसेच भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 179, 180, 3 (5) अन्वये तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापुरात शिवसेना शिंदे गटाच्या तालुका प्रमुख दीपक पाटील दांदळेला नाशिकच्या एलसीबीने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.