Akola News अकोला : खरीप हंगाम तोंडावर आला कि शेतकरी पेरणीच्या तयारीला लागत असतात. अशातच यंदा मान्सून (Monsoon 2024 Arrival Date) 31 मे रोजीच केरळला दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. तर मान्सून महाराष्ट्रात देखील वेळेवर दाखल होणार (Maharashtra Monsoon Update) असून साधारणपणे 7 जून रोजी तळकोकणात मान्सून दाखल होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची शेतीच्या कामसाठी एकच लगबग सुरू आहे. तर दुसरीकडे अवकाळी पावसामुळे(Unseasonal Rain) झालेल्या नुकसानी मधून सावरणाऱ्या शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात तरी निसर्गराजा साथ देईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, हल्ली शेतकर्‍यांना अस्मानी संकटासह इतर अनेक संकटांचा सामना करावा लागतोय.


अकोला जिल्ह्याच्या कृषी केंद्रावर कापसाचे बियाणे घेण्यासाठी रणरणत्या उन्हात शेतकऱ्यांची मोठी झुंबड लागल्याचे बघायला मिळत आहे. मात्र नंबर लागल्यानंतरही शेतकऱ्यांच्या हाती केवळ 2 किंवा 3 पॅकेटच बियाणे मिळते आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. तर कृषी केंद्रात अपुऱ्या सेवासुविधांमुळे शेतकऱ्यांना प्रचंड त्रासही सहन करावा लागतो आहे.


अपुऱ्या सेवासुविधांमुळे शेतकऱ्यांमध्ये रोष


अकोला जिल्ह्यात आधीच उष्णतेच्या पाऱ्याने नवा उच्चांक गाठला आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील बहुतांश कृषी केंद्रावर भर ऊन्हात कापसाचे बियाणे घेण्यासाठी कृषी केंद्रावर शेतकऱ्यांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. कापसाचे अजित 155 बियाण्यासाठी जिल्ह्याभरातील कृषी केंद्रांवर शेतकरी पहाटेपासून रांगेत उभे आहे. कृषी केंद्रावरील अपुऱ्या सेवासुविधांमुळे ऊन आणि पाण्याविना शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. यात युवा शेतकऱ्यांसह ज्येष्ठ शेतकरी वर्ग देखील रांगेमध्ये उभे असल्याचे बघायला मिळाले आहे.


तर थकवा जाणवल्याने काही शेतकरी रांगेत खाली बसले आहेत. इथे उन्हापासून बचाव म्हणून शेतकऱ्यांसाठी कुठल्याही प्रकारचा मंडप उभारला गेला नाहीये. पहाटे 6 वाजल्यापासून बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना रांगेत उभे राहावे लागत असताना मात्र नंबर लागल्यानंतर शेतकऱ्यांच्या हाती केवळ 2 किंवा 3 बियाण्याचे पॅकेट मिळते आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.


पाहटेपासून शेतकरी रांगेत 


अकोल्यात गेल्या काही दिवसांपासून ऊन्हाच्या तपमानाचा पारा 45 अंशाच्या पार गेला आहे. त्यामुळे अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात कलम 144 लागू केली आहे. त्यात दुसरीकडे उन्हात शेतकऱ्यांना  बियाणे घेण्यासाठी भर उन्हात रांगेत उभे राहावं  लागत आहे. उन्हाचा धोका लक्षात घेता प्रशासनाने याबाबत योग्य त्या सेवा-सुविधा पुरवाव्या आणि आवश्यक तितक्या स्वरूपात बियाणे उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी शेतकर्‍यांकडून करण्यात आली आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या