Akola Lok Sabha constituency : आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) पहिल्या टप्प्यातील मतदानाची रणधुमाळीची सांगता झालीय. पूर्व विदर्भातील पाच मतदासंघातील मतदारांचा कौल मतपेटीत बंद झाला असून अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य आता निकालानंतर ठरणार आहे. त्यामुळे आता दुसऱ्या टप्पातील निवडणुकांच्या प्रचाराचा आधिक जोर वाढला आहे. विदर्भासह मराठवाड्यातील आठ मतदारसंघात येत्या 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने महायुती, महाविकास आघाडी आणि इतर पक्षानी आपल्या प्रचाराचा मोर्चा त्या दिशेने वळवला आहे.
अशातच महायुतीच्या (Mahayuti) वतीने आपल्या उमेदवारच्या प्रचारार्थ महाराष्ट्रात मेगा प्लान तयार करण्यात आला आहे. मात्र आकोल्यात (Akola) महायुतीकडून आयोजित करण्यात आलेल्या सभा रद्द करण्यात आल्या आहेत. यात उद्या अकोला येथे होणारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या सभेचा देखील समावेश आहे. मात्र या सभा रद्द करण्यामागील नेमके कारण काय, हे अद्याप कळू शकलेले नाही. मात्र अचानक सभा रद्द करण्यात आल्याने भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अकोल्यातील दिग्गज भाजप नेत्यांच्या सभा रद्द
अकोल्यात महायुतीकडून भाजपचे नेते अनुप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ उद्या, 21 एप्रिलला अकोल्यात भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी आकोल्यातील क्रिकेट क्लब मैदानावर या सभेची जय्यत तयारी करण्यात आली होती. या सभेला प्रामुख्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपचे स्टार प्रचारक योगी आदित्यनाथ हे उपस्थित राहणार होते. मात्र उद्या होणारी ही सभा अचानक रद्द करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. यासोबतच आज दुपारी 4 वाजता मुर्तिजापूर येथे होणारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा सुद्धा रद्द करण्यात आली आहे.
अनुप धोत्रे यांच्या अर्ज दाखल करण्याच्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर भाजपचे नेते उपस्थित झाले होते. त्यानंतर भाजपच्या सभेसाठी कोणताही मोठा नेता अकोला मतदारसंघात आला नाही. अशातच पूर्व नियोजित नेत्यांच्या सभा रद्द झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याची प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. तर दुसरीकडे या सभा रद्द होण्यामागील नेमकं कारण काय, हे अद्याप कळू शकलेले नाही.
अकोला लोकसभेत तिरंगी लढत
अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने निष्णात ऑर्थोपेडिक सर्जन असलेल्या अभय पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर हे वंचितकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महायुतीकडून भाजपचे अनुप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली असल्याने अकोला लोकसभेत तिरंगी लढत होणार आहे. या मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांची मोठी ताकद आहे. याच कारणामुळे त्यांनी या जागेवरून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे काँग्रेसनेही डॉ. अभय पाटील यांना तिकीट दिले आहे. मात्र ओपीनियन पोलनुसार येथे चुरशीची लढत होण्याची शक्यता असली तरी तेथे भाजपाचेच धोत्रे बाजी मारतील असा अंदाज व्यक्त केला जातोय.
इतर महत्वाच्या बातम्या