अकोला : राज्यातील विमा कंपन्यांच्याविरोधात आता शेतकरी आक्रमक व्हायला लागले आहेत. अकोल्यात संतप्त शेतकऱ्यांनी चक्क विमा कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात कोंडण्याचा प्रकार घडला आहे. शहरातील गोरक्षण मार्गावरील 'न्यू इंडिया इन्शुरन्स' कार्यालयात हा प्रकार घडला आहे. संध्याकाळी पाचपासून शेतकऱ्यांनी या 14 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्वत:सह कोंडून ठेवलं होतं. आंदोलन करणारे सर्व 37 शेतकरी उत्पादक आहे. अकोट तालुक्यातील पणजी, रुईखेड आणि बोचरा या गावातील हे सर्व शेतकरी आहे.


डिसेंबर ते जुलैदरम्यान अवकाळी पावसाने झालेल्या केळी नुकसानीचा विमा कंपनीनं सप्टेंबरमध्येच देणं अपेक्षित होतं. मात्र, या कंपनीनं या शेतकऱ्यांना रक्कम द्यायला टाळाटाळ केल्यानं या शेतकऱ्यांनी आज अखेर आंदोलनाचा पवित्रा घेतला. दरम्यान, या आंदोलनानंतर वंचित बहुजन आघाडी, शिवसनेचे नेतेही या कार्यालयात पोहोचले होते. आंदोलन चिघळण्याची शकता लक्षात घेत विमा कंपनीनं शेतकऱ्यांचे केळी विम्याचे दावे 21 नोव्हेंबरपर्यंत कोणत्याही त्रुटीशिवाय निकाली काढण्याचं लेखी आश्वासन दिलं. अखेर संध्याकाळी सव्वाआठ वाजता या सर्व शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन मागं घेतलं आहे.