अकोला : महात्मा गांधींविरोधातील वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजाच्या (Kalicharan Maharaj) अडचणीत आणखी भर पडली आहे. महात्मा गांधींविरोधात वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजाचा अटकपूर्व जामीन अर्ज अकोला जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. रायपूर येथे रविवारी पार पडलेल्या धर्मसभेत अकोला येथील कालीचरण महाराजाने आपल्या भाषणात महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द उच्चारत वादग्रस्त वक्तव्य केले होते. याचे पडसाद देशभरात उमटत आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रातून या वक्तव्याचा निषेध नोंदविला जात आहे. कालीचरणला अटक व्हावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. दरम्यान, काल अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने कालीचरण महाराजाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
छत्तीसगडमधील रायपूर येथे धर्म संसदेत कालीचरण महाराजाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरून वादग्रस्त वक्तव्य केले होते. फिर्यादी काँग्रेस नेते प्रशांत गावंडे यांच्या तक्रारीवरून अकोल्यात कालीचरण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर कालीचरण महाराजाने कोर्टात धाव घेवून, अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. काल (दि. 29) या अर्जावर अकोला न्यायालय येथे सुनावणी झाली. न्या. शर्मा यांच्यासमोर दोन्ही पक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. गावंडे यांची बाजू ऍड. नजीब शेख यांनी मांडली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने कालीचरण याचा अटक पूर्व जामीन अर्ज नामंजूर केला आहे.
कोण आहे 'कालीचरण महाराज' :
'कालीचरण महाराज' अकोल्यातील जूने शहर भागातील शिवाजीनगर मध्ये 'भावसार पंचबंगला' भागात राहतो. अकोल्यातील तरुणाईमध्ये या महाराजाची मोठी क्रेझ आहे. मात्र, कालीचरण महाराज आपल्या भूतकाळाविषयी फारसं काही कुणाला सांगत नाहीत. त्यांच मुळ नाव 'अभिजीत धनंजय सराग'. शिवाजीनगर भागातील धनंजय आणि सुमित्रा सराग या दांपत्याच्या पोटी कालीचरण महाराज याचा जन्म झाला. लहानपणी अभिजीत अत्यंत खोडकर होता. त्याला शाळेतही जाण्याचा कंटाळा यायचा. लहानपणापासून त्याचा ओढा अध्यात्माकडे अधिक. त्यातही तो कालीमातेची आराधना करायचा. घरच्यांना तो शिकावा, काहीतरी वेगळं काम करावं असं वाटायचं. मात्र, या परिस्थितीतही त्याचा अध्यात्मावरचा विश्वास आणि ओढा वाढत गेला. पुढे अभिजीतचा 'कालीपुत्र कालीचरण' झाला. पुढे लोकांनी त्याला 'महाराज' संबोधनं सुरू केलं. मात्र, 'कालीचरण महाराज' स्वत: आपण महाराज नव्हे तर 'कालीमाते'चा भक्त आणि पुत्र असल्याचं सांगतो
कालिचरण महाराजांबद्दल संक्षिप्त माहिती :
1) कालीचरण महाराजाचं मूळ नाव अभिजीत धनंजय सराग.
2) अकोल्यातील जूने शहर भागातील शिवाजीनगर भागातील भावसार पंच बंगल्याजवळ वास्तव्य.
3) आठव्या वर्गापर्यंत शिक्षण. अध्यात्माकडील ओढ्यामुळे शिक्षण सोडलं. हरिद्वारला जात दिक्षा घेतली.
4) कालिभक्त म्हणून कालिचरण महाराज नाव धारण केलं. दोन वर्षांपुर्वी शिवतांडव स्तोत्र व्हिडीओमूळे देशभरात लोकप्रिय. कट्टर हिंदूत्ववादाचे पुरस्कर्ता.
5) 2017 मध्ये अकोला महापालिकेच्या निवडणुकीत पराभूत.
अकोल्यात दाखल झाले होते गुन्हे :
दरम्यान, सोमवारी अकोल्यात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात कालीचरण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार अर्ज दिला होता. मात्र, पोलिसांनी तक्रार घेण्यास इन्कार केल्याने पदाधिकाऱ्यांनी ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन केलं होतं. अखेर साडेचार तासांनंतर पोलिसांनी या अर्जाची दखल घेऊन कालीचरण याच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले होते.
विधानसभेत कालीचरणवर कारवाईची मागणी :
रायपूर येथील धर्मसभेत कालीचरण महाराजाने केलेल्या वक्तव्याबाबत राज्यमंत्री नवाब मलिक यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता. कालीचरण महाराजाविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी नवाब मलिक यांनी केली होती. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही कालीचरणवर कारवाईचा आग्रह सरकारकडे धरला होता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड यांनीही विधानसभेत कालीचरण महाराजांवर कारवाईची मागणी केली होती. सरकारची बाजू मांडताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारवाईचे आश्वासन दिले होते. राष्ट्रपिता महात्मा गांधींवर आक्षेपार्ह्य टिप्पणी करणाऱ्या कालीचरण महाराजाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या