ठाणे : महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करणारा तथाकथित संत कालिचरण याच्यावर गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या फिर्यादीवरून नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायपूर येथे झालेल्या धर्मसंसदेमध्ये तथाकथित संत कालिचरण याने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर आक्षेपार्ह टीका करून नथुराम गोडसे याचे उदात्तीकरण केले होते. त्यामुळे देशभर संताप व्यक्त केला जात आहे. ही टीका करून कालिचरण याने देशवासियांचा अवमान केला आहे. त्याबद्दल डाॅ.जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह कार्यकर्त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात धडक दिली.


तसेच कालिचरण यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली. ही विधाने करीत असताना त्याने आपल्या विधानाचेही समर्थन करत, आपल्या वाटेत येणाऱ्या लोकांना कापून टाकण्याची धमकी दिली आहे. या आधीही कालिचरण बाबाने धार्मिक द्वेष पसरवणारी भाषणे केली आहेत. त्यामुळेच आपण नौपाडा पोलीस ठाण्यात जाऊन कालिचरण बाबांबरोबर भादंवि  294, 295(अ), 298, 505(2), 506, आणि 34 ( 34) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. फॅसिझमच्या   विरुद्ध मैदानात उतरून लढावच लागेल. गोडसेच्या पाठीराख्यांना कायद्याच्या तरतुदीनुसार अद्दल घडवावी लागेल. त्यामुळेच आपण स्वतः दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक न ठेवता कालीचरण बाबा विरुद्ध नौपाडा पोलीस स्टेशन ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे. ही विचारांची लढाई आहे आणि आपण ही लढाई लढणार आहोत, असे आव्हाड यांनी सांगितले. 


पुण्यातही गुन्हा दाखल


चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी कालीचरण महाराज आणि मिलिंद एकबोटे यांच्याविरुद्ध पुण्यातही गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुण्यातील नातूबागेत 19 डिसेंबरला समस्त हिंदू आघाडीच्यावतीने अफझलखान वधाचा आनंदोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला होता. यावेळी कालीचरण महाराज,  मिलींद एकबोटे  आणि इतरांनी समाजामधे तेढ निर्माण होईल, अशी भाषणे केली. अशा प्रकारचाव्हिडीओ क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याची दखल घेत पोलीसांनी त्याची चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा गुन्हा नोंद केला आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha