अकोला: अकोल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत नेहमीच चर्चेत असतात ते त्यांच्या अनेक उपक्रमांमुळे. मात्र सध्या अकोल्यात त्यांचा शांताबाई गाण्यावरचा डान्स चांगलाच व्हायरल झाला आहे.
२३ जानेवारीला अकोल्यात जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या खेळ आणि सांस्कृतिक स्पर्धेचा समारोप झाला.
या स्पर्धेच्या समारोप कार्यक्रमात जी. श्रीकांत यांनी 'शांताबाई' गाण्यावर ताल धरला.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना नृत्य करण्यासाठी विनंती करण्यात आली. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनीही मग आढेवेढे न घेता या गाण्यावर ठुमके लगावत उपस्थित कर्मचाऱ्यांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला.
तसंही जी. श्रीकांत यांचं नृत्यातलं कसब अन प्राविण्य अकोलेकरांनी वारंवार पाहिलंय. याआधी १४ ऑगस्ट २०१६ ला अकोल्यातील नर्सेस संघटनेच्या स्नेहमिलन सोहळ्यातही श्रीकांत यांनी 'वाट लावली' गाण्यावर नृत्य केलं होतं. तो व्हिडीओही त्यावेळी मोठ्या प्रमाणात 'व्हायरल' झाला होता.
सध्याही अकोला जिल्हाधिकाऱ्यांच्या 'शांताबाई'वर लावलेल्या ठुमक्यांची मोठी चर्चा अकोल्यात ऐकायला मिळते आहे.