रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावरुन मंगलोर ते दिल्ली धावणाऱ्या मंगला एक्स्प्रेसमध्ये ज्योती विश्वकर्मा या महिलेची सुखरुप प्रसुती करण्यात आली. यावेळी ट्रेनमधील दोन नर्स प्रवासी आणि सहप्रवाशांच्या मदतीनं ज्योतीनं एका गोंडस मुलीला जन्म दिला.
कोकण रेल्वे मार्गावर मंगलोर ते दिल्ली धावणाऱ्या मंगला एक्सप्रेसमधून रवींद्र कुमार विश्वकर्म आणि त्यांची गरोदर पत्नी प्रवास करत होते. या प्रवासातच रवींद्रच्या पत्नीला प्रसूती वेदना सुरु झाल्या, आणि तिने बोगीतील टॉयलेटच्या दिशेने धाव घेतली. बरोबर प्रवास करणाऱ्या सहप्रवाशांना त्यांनी याची कल्पना दिल्यानंतर एक्सप्रेसमधील अनेकजण त्यांच्या मदतीसाठी धावले. यावेळी या ट्रेनमधील दोन नर्सच्या मदतीने तिची यशस्वी प्रसुती केली.
यानंतर मंगला एक्सप्रेसला सावर्डे स्थानकात थांबा नसताना टीसींनी मंगला एक्सप्रेस सावर्डे स्थानकात थांबवली. आणि या तान्हुलीला आणि तिच्या आईला डेरवणच्या वालावलकर रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. या दाम्पत्याची आर्थिक स्थिती अगदीच बेताची आहे,याची कल्पना आल्यावर ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या इतर प्रवाश्यांनी उपचारासाठी पैसे गोळा करुन दिले.
दरम्यान, या सर्व प्रसंगाने भारावून गेलेल्या रवींद्र आणि त्यांच्या पत्नीने आपल्या या गोंडस मुलीचं नावही मंगलाच ठेवणार असल्याचं जाहीर केलं आहे.