बारामती : बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंविरोधात शड्डू ठोकल्यानंतर सुविद्य पत्नी सुनेत्रा पवार यांनीही आता बारामती लोकसभा मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. आज (22 फेब्रुवारी) अखिल बारामती लोहार समाज श्री विश्वकर्मा जयंती उत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून सुनेत्रा पवार यांनी उपस्थिती लावली. यावेळी सुनेत्रा पवार लोहार समाजाच्या स्वागत करण्यात आले. सुनेत्रा पवार यांनी भिगवणमध्येही दौरा करताना सूचक राजकीय भाष्य केले. 


बारामतीकरांचे हे पाठबळ कायमस्वरूपी राहणार


यावेळी बोलताना सुनेत्रा पवार यांनी भावनिक साद घातली. त्या म्हणाल्या की, विश्वाची निर्मिती करणाऱ्या विश्वकर्मा यांच्या चरणी मी नतमस्तक होते. जगाची निर्मिती विश्वकर्मा यांनी केली याची आख्यायिका आपण ऐकतो. महायुती सरकारच्या विकास सुरू आहे. आदरणीय अजित दादा पवार यांच्यामार्फत मोठा विकास होत आहे. आदरणीय दादा यांचे प्रेम आहे आणि तेवढेच प्रेम बारामतीकरांचे आहे. दादा सकाळी 6 वाजलेपासून काम करतात, बारामतीकरांचे हे पाठबळ कायमस्वरूपी राहणार असल्याचे त्या म्हणाल्या. देश आणि राज्यात विकासाच्या कामाला साथ देऊया, असे आवाहन त्यांनी केले. 


आता भिगवण मधील लोकांच्या भेटी वारंवार घ्याव्या लागतील!


दुसरीकडे, खरंच सुनेत्रा पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढणार का असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. आज इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये सुनेत्रा पवारांनी केलेलं वक्तव्य सुद्धा चर्चेचा विषय ठरला. त्या म्हणाल्या की, मी भिगवणमध्ये पहिल्यांदा आले आहे. प्रचाराच्या निमित्ताने मी कधी भिगवणमध्ये आले नव्हते, पण आता भिगवणमधील लोकांच्या भेटी वारंवार घ्याव्या लागतील असं सुनेत्रा पवार म्हणताच एकच हशा पिकला. सुनेत्रा पवार या भिगवणमध्ये मराठा महासंघाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या छत्रपती शिवराय सार्वजनिक वाचनालय भेट देण्यासाठी आल्या त्यावेळी त्या बोलत होत्या. 


चिरंजीव जय पवार म्हणाले दुसरचं काही!


दरम्यान, महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळेच उमेदवार असल्याने कुटुंबातील लढाई अवघड जाईल का? असे विचारले असता अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, अजून उमेदवार निश्चित झालेला नाही. यापूर्वी दोनदा मी प्रचार केला आहे आताही प्रचार करेन. सुनेत्रा पवारांची चर्चा होत आहे, पण ज्यावेळी दादा आपला उमेदवार जाहीर करतील त्यावेळी आपल्याला समजेल कुटुंब म्हणून मी अजित पवारांना विचारल्यानंतर त्यांनी आपल्याला प्रचार करायचा असल्याचे सांगितले. कुटुंबाला एकटं पाडलं आहे असं मला वाटत नाही, असेही ते म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या