मुंबई : लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असतानाच राज्यात महाविकास आघाडी जागावाटप अजूनही रखडलं असल्याचे स्पष्ट झालं आहे. आज (22 फेब्रुवारी) काँग्रेसची राज्य निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये काँग्रेसकडून मुंबईमध्ये सहापैकी तीन जागांची मागणी करण्यात आली. त्यामुळे उद्धव ठाकरेंकडून ज्या जागांवर दावा करण्यात आला आहे, त्याच जागेवर काँग्रेसकडूनही दावा करण्यात आल्याने आता हा कळीचा मुद्दा राहणार आहे. 


मुंबईतील तीन जागांवर दावा 


27 फेब्रुवारीच्या बैठकीमध्ये मुंबईमधील बैठकीत काथ्याकूट होण्याची शक्यता आहे. मुंबईमधील दक्षिण मध्य, उत्तर पश्चिम आणि उत्तर मध्य या तीन जागांसाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. काँग्रेसने तीन जागा लढवाव्यात आणि ठाकरे गटाने तीन जागा लढाव्यात अशी बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. त्यामुळे आता ज्या मतदारसंघांवर ठाकरे यांनी दावा केला आहे, तेच मतदारसंघ आता सोडणार का? याकडे आता लक्ष लागला आहे. 


दक्षिण मध्य मुंबईच्या जागेसाठी ठाकरे गटाचा दावा


दुसरीकडे, दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवरुन तिढा निर्माण झाला आहे. ठाकरे गटाकडून (Thackeray Group) या जागेसाठी दावा करण्यात आला आहे. येत्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये ठाकरे गटाकडून अनिल देसाई रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्याची तयारी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच अनिल देसाई यांना तयारी करण्याबाबत हिरवा कंदील देण्यात आल्याचं देखील सांगण्यात आलं आहे. त्यामुळे काही दिवसांपासून अनिल देसाई हे दक्षिण मध्य मुंबईमधील शाखांना भेटी देणे त्यासोबत बैठका घ्यायला सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाकडून अनिल देसाई यांना उमेदवारी जाहीर केल्यास शिवसेना खासदार राहुल शेवाळे विरोधात उभे राहू शकतात. याच जागेवर काँग्रेसकडून देखील दावा आहे. 


उत्तर पश्चिम मतदारसंघ सोडण्यास स्पष्ट नकार


दुसरीकडे, उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ ( Mumbai North West Loksabha) जागा सोडण्यास उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्पष्ट नकार दिला आहे. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ हा खासदार गजानन किर्तीकर यांच्याकडे आहे. गजानन किर्तीकरांनी शिवसेनेतून ही जागा लढवली, पण शिवसेनेत फूट पडल्यानंतर गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. ठाकरे गटाकडून 23 जागांवर दावा करण्यात आला असून त्यामध्ये उत्तर पश्चिम मुंबई म्हणजेच गजानन किर्तीकर यांच्या जागेचा देखील समावेश आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या