पुणे : पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बापटांना अप्रत्यक्षपणे दम भरला. मी शांत आहे, तोपर्यंत आहे, माझा नाद करायचा नाय, असा इशारा अजित पवारांनी दिला.


अजित पवारांनी पुण्यात नारळ फोडण्याशिवाय काहीच कामे केली नाहीत, अशी टीका बापटांनी केली होती. या टीकेला उत्तर देताना अजित पवारांनी हा इशारा दिला. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वरवंड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनात बोलताना अजित पवारांनी भाजपवर निशाणा साधला.

''मी बापटांना सांगतोय, मी शांत आहे तो पर्यंत शांत आहे, नाद करायचा नाय बापट... तुम्ही माझ्या बरोबर दहा वर्ष काम केलेलं आहे... आम्ही पण प्रत्येकाचा आदर करतो, पवार साहेबांची तशी शिकवण आहे, तुम्ही काय-काय वक्तव्य केली ते इथे महिला असल्याने काढू इच्छित नाही आणि ते सर्वांना माहित आहे आपला आवाका काय आपली कुवत काय, आपण करताय काय,'' असं म्हणत अजित पवारांनी बापटांचा खरपूस समाचार घेतला.

अजित पवारांच्या चालू भाषणात सुनील तटकरेंचा साष्टांग दंडवत

''बारामती लोकसभा मतदारसंघातून उभं राहणार का, असं मी अनेकांना विचारलं. प्रत्येक जण नाही म्हणतायत. त्यामुळे सुप्रिया सुळेच या लोकसभेच्या उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे. मात्र यासाठी तटकरे साहेबांची संमती असायला पाहिजे... मी कसा काय तटकरे साहेबांचा अधिकार घेऊ शकतो... कुठल्या विभागात कोणाला तिकीट द्यायचं हा अधिकार प्रदेशाध्यक्ष या नात्याने तटकरे यांनाच आहे,'' असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार असं म्हणताच व्यासपीठावर मागे बसलेल्या तटकरे यांनी उठून अजित पवार यांना साष्टांग दंडवत घातला. दरम्यान, तटकरेंच्या या कृतीमुळे राष्ट्रवादीत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार हे अजित पवारांनाच आहेत का, अशीही कुजबूज सुरु झाली.