बारामती : अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अजित पवार गोत्यात आले होते. मात्र, वेळेवेळी त्यांनी त्याबद्दल दिलगिरीही व्यक्त केली. असे वादग्रस्त काही आपल्या तोंडून निघू नये म्हणून मेंदूला सांगत असतो, असे बारामतीतल्या एका सभेत बोलताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले.
नुकत्याच पार पडलेल्या बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणून आलेल्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांसह नगरसेवकांचा सत्कार समारंभ आज बारामतीत पार पडला. त्यावेळी अजित पवार बोलत होते.
मेंदूला सारखं सांगतो, कुठलाच चुकीचा शब्द जाऊ देऊ नकोस : अजित पवार
“मी सारखं माझ्या मेंदूला सांगत असतो की, ये शहाण्या दुसऱ्या मेंदूला कुठलाच शब्द चुकीचा जाऊ देऊ नकोस. कारण मानवाला दोन मेंदू असतात”, असे म्हणत अजित पवार म्हणाले. “आपण बोलताना भान ठेवावं, असा सल्ला अजित पवार यांनी निवडून आलेल्या नगरसेवकांना दिला. तर, मीही बोलताना आता खूप काळजीपूर्वक बोलत असल्याचेही अजित पवारांनी आवर्जून सांगितले.
...म्हणून पंतप्रधान मोदींना समाजात काय चाललंय, हे कळत नाही : अजित पवार
“समाजात काय चाललं आहे, हे एखाद्या नेत्याला कळण्यासाठी त्याला घर-प्रपंच असणं गरजेचे असतं. घरची लोक त्या नेत्याच्या बाबतीत समाजात काय बोलतात, हे घरी आल्यावर स्पष्ट सांगतात. मात्र, देशाच्या पंतप्रधानांना संसार-प्रपंचच नसल्याने, त्यांना समाजात काय चाललंय हे काय समजतच नाही.”, असे म्हणत अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नोटाबंदीबाबत टीका केली.
बारामती नगरपरिषदेच्या निवडणूकीत राष्ट्रवादीच्या दोन माजी नगराध्यक्षांचा पराभव झाल्याने राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात धक्का बसला होता. "निवडणुकीच्या वेळेस काहींना फाजील आत्मविश्वास नडला", असे म्हणत अजित पवारांनी अनेकांना टोले लगावले.
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवस्मारकाचे भूमीपूजन : अजित पवार
"राज्यात महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं अरबी समुद्रात भूमिपूजन करण्याचा प्रयत्न असून, भूमीपूजनाव्यतिरिक्त भाजप-शिवसेना सरकार काहीही करत नसून जाहिरातीवर मात्र अनाठायी खर्च करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलचे भूमीपूजन झाले असताना, अजून त्याठिकाणी एक खड्डादेखील यांनी खोदला नाही, तर याबाबत आजून ठोस निर्णय या सरकारने केलेला नाही. केवळ निवडणुका डोळयासमोर ठेवूनच हा निर्णय घेतला आहे.", अशी टीका अजित पवार यांनी केली.