Ajit Pawar : पुण्याचे (Pune) पालकमंत्री चंद्रकांत पाटील (chandrakant Patil) यांनी केलेलं आई-वडिलांवरील वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी आहे, अशी टीका विरोधीपक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) केली आहे. आई-वडिलांना शिव्या द्या मात्र मोदी-शहांना शिव्या काहीही म्हणू नका, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केलं होतं, त्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांबरोबर शहरातील विविध समस्यांवर बैठक घेतली, त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
चंद्रकांत पाटलांसारख्या महत्वाच्या पदावर असलेल्या मंत्र्यांनी अशा प्रकरची वक्तव्यं करु नये. त्यांना यंदा कमी दर्जाचं मंत्रिपद मिळालं आहे म्हणून कदाचित ते नाराज असतील,असा टोला देखील त्यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे. महाराष्ट्रात नाही तर कुठेच कोणी कोणाला शिव्या देऊ नये. शिव्या देऊन नोकरी लागणार नाही आणि महागाईदेखील कमी होणार नाही आहे. त्यांच्यात काही सुसंस्कृतपणा आहे की नाही?, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
'नाशिकचा अपघात भीषण '
नाशिकमध्ये झालेला अपघात भीषण आहे. त्यासंदर्भात सगळी माहिती घेत मी ट्वीटदेखील केलं आहे. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ यांनी देखील अपघाताच्या स्थळाला भेट देऊन पाहाणी केली आहे.12 लोक मृत्युमुखी पडले आहेत. ही बाब महाराष्ट्रासाठी दुख:द आहे, असे विचित्र अपघात होतात, दोष कुणाला द्यायचा हे समजत नाही. मृत्युमुखी पडले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी नाशिकच्या अपघातावर दिली आहे.
शिवसेनेसाठी एकट्या बाळासाहेब ठाकरे यांचा योगदान: अजित पवार
बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेली ही शिवसेना आहे. मला जशी साथ दिली तसं उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना संभाळून घ्या, असं बाळासाहेब ठाकरे यांनी हयात असताना सांगितलं होतं. शिवसेनेसाठी एकट्या बाळासाहेब ठाकरे यांचा योगदान आहे. महाराष्ट्रातील प्रमुख चार पक्षांपैकी शिवसेना एक पक्ष आहे. त्यामुळे चिन्हाबाबत निर्णय देताना निवडणूक आयोगाने हा विचार करावा, त्यानंतर त्यांनी निर्णय द्यावा, अशी भूमिका अजित पवारांनी शिवसेनेच्या सुरु असलेल्या चिन्हाच्या वादावर स्पष्ट केली आहे.
शिंदे-फडणवीस सरकारकडून दुसरी अपेक्षा काय?
सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणातील एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर परत घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यांच्या या निर्णयावर अजित पवारांनी टीका केली आहे. शिंदे-फडणवीस सरकारकडून दुसरी कोणती अपेक्षा असणार आहे, असं देखील ते म्हणाले.
'महापालिकेच्या निवडणुका मुद्दाम लांबवत आहेत'
राज्य सरकार सद्यस्थितीत महापालिका निवडणूक घेण्याच्या मूडमध्ये नाही. राज्य सरकारला या निवडणुका लांबणीवर टाकायच्या आहेत. पोट निवडणूक लावू शकता मग महापालिकेच्या निवडणुका का लावत नाही , असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.
संबंधित बातम्या-