Almatti dam height : कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची (Almatti dam height) वाढवण्याबाबत सुतोवाच करण्यात आल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात धडकी भरली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री एस आर बोम्मई यांनी अलमट्टीची सध्याची 519:66 मीटरची उंची वाढवून ती 524 मीटर करणार असल्याचे वक्तव्य केले आहे. मात्र, या निर्णयाने सांगली-कोल्हापूर जिल्ह्याला मोठा दणका बसणार आहे. अलमट्टी धरणाच्या उंची वाढीला आमचा विरोध असून यासाठी जनलढा उभारणार असल्याची माहिती आंदोलन अंकुशचे धनाजी चूडमुंगे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. कुरुंदवाड येथील टेनिस हॉल येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


पत्रकार परिषदेत पुढे बोलताना चूडमुंगे म्हणाले की, 2005 ते 2021 पर्यंत सांगली कोल्हापूर जिल्ह्यात 4 महापूर आले. त्याला अलमट्टी धरण जबाबदार असल्याचा पुरग्रस्तांची ठाम धारणा आहे. अलमट्टी धरणाची सध्याची 519:66 मीटर उंची असताना महापूर आला होता. ज्यावेळी पाण्याचे नियोजन चुकले त्यावेळी महापूर आला आहे.


महाराष्ट्रात काय परिस्थिती निर्माण होईल याची कल्पना आहे का?


पावसाळ्यात अलमट्टीने 519:66 मीटर उंचीने पाणी साठवले व कोयना धरण क्षेत्रात मोठा पाऊस झाला. पूर परिस्थिती निर्माण होऊ लागली, तर महाराष्ट्र सरकारला कर्नाटक सरकारला पाणी पातळी कमी करण्यासाठी विनवण्या कराव्या लागतात. मग कर्नाटक सरकार एक दोन मीटरने पाणी पातळी कमी केल्यानंतर म्हणजे अलमट्टीतून प्रति सेकंद 1 लाख ते 4 लाख क्युसेकने पाणी सोडून व पाणी पातळी 517मीटरने खाली आणून पूर नियंत्रित केला जातो. महाराष्ट्रात पूर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून 5 लाखाने विसर्ग केल,तरी पाणी पातळी ते 520 मीटरवर आणू शकणार नाहीत, अशा वेळी महाराष्ट्रात काय परिस्थिती निर्माण होईल याची कल्पना आहे का? असा सवाल चुडमुंगे यांनी उपस्थित केला. 


चुडमुंगे पुढे म्हणाले की, अलमट्टीची उंची वाढवण्यास सर्वांनी एकत्रित लढा देण्याची गरज असून मोठा उठाव करून सरकारी पातळीवर कर्नाटक सरकारचा मनसुबा उधळून लावला पाहिजे. आंदोलन अंकुश गेल्या वर्षांपासून यासाठी काम करत आहे. मात्र लोकप्रतिनिधींसह सर्वांनी यामध्ये सहभाग घेऊन व्यापक स्वरूप देण्याची गरज निर्माण झाल्याचे सांगितले. यावेळी भूषण गंगावणे,प्रभाकर बंडगर,राजू पाटील-टाकळीकर,अविनाश जगदाळे आदी उपस्थित होते.


इतर महत्वाच्या बातम्या