बारामती: मराठा मूकमोर्चांमधून आरक्षणाची मागणी जोर धरत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आता आरक्षणाच्या दुसऱ्या बाजूवर बोट ठेवलं आहे. 'अनेकांना आरक्षण हवं असतं मात्र, जेव्हा लग्नाची वेळ येते तेव्हा सर्वजण आरक्षण लपवून आम्ही कसे वरच्या दर्जाचे आहोत याचाच खटाटोप करत असतात.' असं वक्तव्य अजित पवारांनी केलं. ते आज बारामतीत बोलत होते.

'माझ्यासह सगळ्यांना आरक्षण पाहिजे पण लग्नसमारंभ या गोष्टी आल्या की मग सगळे आरक्षण बाजूला ठेवून आम्ही कडूतले नाही, आम्ही वरच्या दर्जाचे... लय लय वरचे असे सांगायलाही विसरत नाहीत. याबाबत मी खूप ऐकलं आहे. जाऊ दे आता काही जास्त बोलत नाही. मागं काय काय बोलून माझं लय वंगाळ झालंय' असं म्हणत पवारांनी आरक्षणाची दुसरी बाजू मांडली.

एकीकडे मराठा समाज आरक्षण मुद्यावर आक्रमक होत आसताना अजित पवारांनी केलेले हे विधान त्यांना चांगलंच भोवू शकतं. बारामती पंचायत समितीच्या वतीनं मोरोपंत सभागृहात आर्दश शिक्षकांचा गुणगौरव सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते.

VIDEO: