सोलापूर : अनेक नेत्यांच्या वेगवेगळ्या चौकशा सुरू आहेत. या चौकशीच्या भीतीने तसेच यात सरकारची मदत व्हावी या हेतूने अनेकजण पक्ष सोडत असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला आहे. कुणी पक्षातून जात असेल तर आपण काही करू शकत नाही. कुण्याच्या जाण्याने पक्ष कार्य थांबत नाही, असेही पवार म्हणाले. हसन मुश्रीफ यांना देखील ऑफर होती मात्र त्यांनी निष्ठेला महत्व दिलं. कदाचित आणखी काही लोकं पक्ष सोडून जातील, त्यांची काळजी आम्ही करत नाही. पवार साहेबांनी आधी सांगितलं होतं नव्या दम्याच्या लोकांना संधी दिली जाईल, त्यामुळे जुन्या नेत्यांच्या मनात भीती निर्माण झाली असावी' असेही ते म्हणाले.


सत्तेत आल्यास नोकरीत स्थानिकांना 75 टक्के आरक्षण देणार असून त्यासाठी कायदा करणार असल्याचेही अजित पवार म्हणाले. विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी सोलापूर जिल्हा प्रभारी म्हणून अजित पवार सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना भाजप-सेनेवर टीका करत अनेक मुद्यांवर भाष्य केलं.



दरम्यान बार्शीचे आमदार दिलीप सोपल आणि माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे या दोघांनी उमेदवारीच्या मुलाखतींना दांडी मारली. बबन शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे या भाजपच्या तर दिलीप सोपल हे शिवसेनेच्या वाट्यावर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यामुळेच जाणीवपूर्वक अनुपस्थितीत राहिल्याच म्हटलं जातं आहे.  यावर बोलताना ते म्हणाले की, आमदार दिलीप सोपल हे विधानसभेसाठी इच्छुक आहेत मात्र ते बाहेर गावी असल्याने येऊ शकले नाहीत, त्यांचा निरोप आला आहे तर बबनदादा शिंदे यांच्याशी मी बोलणार आहे, असे अजित पवार म्हणाले.

दरम्यान विधानसभेत वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं. 'लोकसभेत वंचित बहुजन आघाडीचा फटका दोघांनाही बसला. सामंजस्याची भूमिका घ्यायला हवी' असे मत यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केलं. आगामी विधानसभेत आघाडीच्या 175 जागा निवडून आणण्याचा निर्धार असल्याचे अजित पवार म्हणाले.

अजित पवार यांनी भाजप शिवसेना यांच्यावरही यावेळी टीका केली. 'राज्य आणि देशपातळीवर लोकांना आमिष दाखवून पक्षात घेतलं जात आहे. आमचं सरकार पाडण्यासाठी घोडेबाजार केला गेला.  कर्नाटकाच्या बाबतीतही हेच घडलं' असे ते म्हणाले.

सोलापुरात राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदारांची विधानसभा उमेदवारीच्या मुलाखतीकडे पाठ

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील दोन विद्यमान आमदारांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारीच्या मुलाखतीकडे पाठ फिरवल्याचं चित्र पाहायला मिळालं. माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे आणि बार्शीचे आमदार दिलीप सोपल हे राष्ट्रवादीच्या मुलाखतीला गैरहजर राहिले. येत्या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या जागांसाठी सोलापूर जिल्हा प्रभारी आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या.

आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे हे भाजपच्या तर आमदार दिलीप सोपल हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याने अनुपस्थित राहिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहेत. मागील विधानसभेत सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीने 4 जागा जिंकल्या होत्या. त्यापैकी हणमंतराव डोळस यांचं निधन झालं आहे तर मोहोळचे आमदार रमेश कदम हे तुरुंगात आहेत. तर उरलेल्या राहिलेल्या दोन्ही आमदारांनी मुलाखतीकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं. दोन्ही आमदारांच्या अनुपस्थितीचे नेमके कारण काय हे अधिकृतरित्या जरी कळालं नसलं तरी यामुळे चर्चा मात्र बऱ्याच रंगल्या आहेत.

नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापुरात आले होते त्यावेळी आमदार बबनदादा शिंदे यांनी विमानतळावर जाऊन त्यांचं स्वागत केलं होतं. त्यांनी गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेटही घेतली होती. बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी सेनेचे उपजिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांची भेट घेऊन बंद दाराआड चर्चा केली होती. त्यामुळे या दोघांच्या पक्ष बदलांच्या चर्चाना अधिक उधाण आलं आहे.

आमदार दिलीप सोपल आणि बबन शिंदे हे दोघेही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. गेली अनेक वर्षे दोन्ही नेत्यांनी राजकीय क्षेत्रात आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. त्यामुळे अशा मातब्बर नेत्यांनी जर राष्ट्रवादीकडे पाठ फिरवली तर आयत्या वेळेस कोणाला उमेदवारी द्यायची असा प्रश्न पक्षसमोर उभं राहण्याची शक्यता आहे.