मुंबई: राज्य सरकारच्या वरिष्ठ पातळीवर राज्यातील मतदारांना ईव्हीएमसोबतच मतपत्रिकेचा पर्याय उपलब्ध करुन देण्यासाठी चाचपणी सुरु असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र त्यावर मिश्किल भाष्य केलं आहे. मतदान यंत्राच्या माध्यमातून हरल्यावर EVM मुळे हरलो असं सांगण्याची एक संधी उपलब्ध असते असं अजित पवार म्हणाले.


राज्यातील मतदारांना ईव्हीएम सोबत मतपत्रिका उपलब्ध करुन देण्यासाठीच्या हालचाली सुरु आहेत का असं विचारल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, "निवडणुकीत मतपत्रिका असणे यात काही अर्थ नाही. आम्ही मतदान यंत्रणांच्या माध्यमातूनच निवडून आलो आहोत. अजूनही मत पत्रिकेचा कोणताही निर्णय झाला नाही. मतदान यंत्राच्या माध्यमातून हरल्यावर आपण EVM मुळे हरलो असं सांगण्याची एक संधी असते."


महाराष्ट्रातील मतदारांना ईव्हीएम व्यतिरिक्त मतपत्रिकेद्वारे देखील मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी विधानसभा अध्यक्षांकडे एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर चर्चा करण्यासाठी 2 फेब्रुवारी रोजी विधानसभेचे त्या वेळचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली होती.


पंतप्रधान शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर भावूक झाले तर आनंद होईल: अजित पवार


स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांना ईव्हीएम व्यतिरिक्त मतपत्रिकेव्दारे देखील मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्याच्या सूचना विधानसभेचे अध्यक्ष श्री. नाना पटोले यांनी दिल्या होत्या. त्या दृष्टीने महाराष्‍ट्र विधानमंडळाने कायदा करावा अशा प्रकारच्या सूचनाही अध्यक्षांनी दिल्या होत्या. त्यामुळे राज्य सरकार आता मतपत्रिकेचा पर्याय उपलब्ध करुन देण्यासाठी कायदेशीर मार्गाने प्रयत्न करणार अशी चर्चा सुरु होती.


राज्य सरकारच्या पातळीवर ईव्हीएम सोबत मतपत्रिका उपलब्ध करुन देण्यासाठी चाचपणी सुरु असताना सरकारचाच एक भाग अललेल्या उपमुख्यमंत्र्यानी अशा प्रकारचे मिश्किल भाष्य केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. उपमुख्यमंत्र्याचं हे विधान भाजपच्या भूमिकेला बळ देणारं आहे का असा सवालही अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.


गेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी पक्षासह सर्वच विरोधी पक्षांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित करत मतदान बॅलेट पेपरवर घ्यावं यासाठी रान उठवलं होतं. लोकसभा निवडणूक झाल्यानंतरही या पक्षाच्या अनेकांनी ईव्हीएममुळेच आपली हार झाल्याचा दावा केला होता. त्यामुळे सर्वच विरोधी पक्षाचा ईव्हीएमच्या वापराला विरोध आहे.


आता सरकारचाच भाग असलेल्या उपमुख्यमंत्र्यांनी निवडणुकीत मतपत्रिका असणे यात काही अर्थ नाही, आम्ही मतदान यंत्रणांच्या माध्यमातूनच निवडून आलो आहोत असं वक्तव्य करत ईव्हीएमवर मिश्किल भाष्य केलंय. त्यामुळे अजित पवारांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असल्याचं पहायला मिळतंय.


महाराष्ट्रातील मतदारांना आता मतत्रिकेचाही पर्याय उपलब्ध होणार? विधानसभा अध्यक्षांची कायदा करण्याची सूचना