याविषयी बागडे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, मला अजित पवारांचा फोन आला होता. मला कुठं आहात असं विचारलं. त्यांनी आपल्या हस्ताक्षरानं लिहिलेला राजीनामा मेल केला. 5.30 वाजता मेल आला. त्यानंतर मला फोन केला. तातडीने राजीनामा मंजूर करा असं सांगितलं. मी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे. असा राजीनामा आला आणि फोन केला तर राजीनामा मंजूर केला जातो, असंही ते म्हणाले.
याविषयी अजित पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांचा देखील अजित पवारांशी संपर्क होऊ शकलेला नाही. दरम्यान, अजित पवारांच्या राजीनाम्यावर शरद पवार यांची रात्री 8 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दिली आहे.
दरम्यान, काही तासापूर्वीच त्यांनी शरद पवार यांना आज दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले आहेत. मुंबईत आदरणीय शरद पवार साहेबांना मोठ्या संख्येनं मिळालेला चाहत्यांचा भक्कम पाठिंबा अभूतपूर्व आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मनापासून आभार! राजकीय हेवेदावे असले तरी, सत्याला साथ देण्यासाठी विरोधकही पुढे आले. हाच आदर,दृढ विश्वास कायम साहेबांसोबत राहील,याची खात्री आहे, असे ट्वीट अजित पवार यांनी केले आहे.