Continues below advertisement


मुंबई : राज्यातील राजकीय आणि क्रीडा क्षेत्राचं लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची निवडणूक आता बिनविरोध झाली. अजित पवारांची (Ajit Pawar) अध्यक्षपदी तर वरिष्ठ उपाध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांची निवड झाली आहे. दादांच्या गटाला 10 जागा तर मोहोळ गटाला 11 जागा देण्यात येणार आहेत. तसेच खजिनदार आणि सचिवपद हे पद मुरलीधर मोहोळांच्या गटाला देण्यात येणार असल्याची माहिती आहे. गेली तीस वर्षे एकहाती वर्चस्व असलेल्या अजित पवारांनी यावेळी अध्यक्षपदासाठीही तडजोड केली आहे.


महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजित पवार हे पहिली दोन वर्षे असतील. तर पुढची दोन वर्षे अध्यक्षपद हे मुरलीधर मोहोळ यांना मिळणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हा तोडगा काढल्याची माहिती समोर येत आहे.


महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीसाठी अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्या गटांनी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे या दोन गटातच निवडणूक होणार हे निश्चित झालं होतं. गेल्या तीस वर्षांपासून या संघटनेवर अजित पवारांचे एकहाती वर्चस्व होतं. त्याला यंदा भाजपकडून आव्हान देण्यात आलं.


Olympic Association Election : मोहोळ गटाला सचिवपदासह जास्त जागा


महायुतीतील दोन नेते एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत असल्याने त्याकडे राजकीय तसेच क्रीडा क्षेत्रातील लोकांचे लक्ष लागलं होतं. मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये मध्यस्ती केली आणि तोडगा काढला. त्यानुसार, अजितदादांच्या गटाला 10 जागा तर मुरलीधर मोहोळ गटाला 11 जागा देण्यात आल्या आहेत. तसेच या संघटनेमध्ये महत्त्वाचं असलेले सचिवपद हे मोहोळ गटाला देण्यात आलं. त्याचसोबत खजिनदार पदही मोहोळ गटाला देण्यात आल्याची माहिती आहे.


Ajit Pawar Vs Murlidhar Mohol : अध्यक्षपदाची वाटणी


अजित पवारांना अध्यक्षपद आणि मुरलीधर मोहोळांना वरिष्ठ उपाध्यक्षपद असा तोडगा काढण्यात आला आहे. असं असलं तरी अजित पवारांना चार वर्षे अध्यक्षपद देण्यात येणार नाही. त्यांच्याकडे पहिली दोन वर्षे अध्यक्षपद असेल, तर पुढची दोन वर्षे मुरलीधर मोहोळ या संघटनेचे अध्यक्ष असतील. या प्रकरणी माजी खासदार आणि महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद अध्यक्ष रामदास तडस यांनीही तसा फॉर्म्युला ठरल्याची माहिती दिली.



Ajit Pawar Vs BJP : दादांना भाजपच्या राजकारणाचा अनुभव


अजित पवार जेव्हा विरोधी पक्षात होते तेव्हा त्यांना भाजपच्या सत्तेचा बरा-वाईट अनुभव आला होता. मात्र त्यावेळीही महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनवर त्यांचे एकहाती वर्चस्व होतं. नंतर ते काका शरद पवारांना सोडून भाजपचे मित्र बनले. आता मित्रपक्ष बनल्यावर देखील अजित पवारांना भाजपच्या सत्तेचा तोच अनुभव येत असल्याचं चित्र आहे. त्यातून महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अनेक महत्वाच्या पदांवर पाणी सोडण्याची वेळ त्यांच्यावर आल्याचं दिसतंय. तसेच दादांचे विश्वासू नामदेव शिरगांवकर यांनाही बाजूला काढण्यात यश मिळवलं आहे. 


सध्या तरी भाजपच्या राजकीय खेळाडूंनी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये प्रवेश केला आहे. आता पुढे ते अजितदादांना चितपट करून संपूर्ण सत्ता हाती घेतात की फडणवीसांनी ठरवलेल्या फॉर्म्युल्यानुसार काम करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. 



ही बातमी वाचा: