मुंबई : राज्यात  'निसर्ग' चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिला. या वादळाच्या तडाख्यात नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. पावसासोबत सोसाट्याच्या वाऱ्यामुळं अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडून गेले. जोरदार वाऱ्याने झाडे उन्मळून पडल्याच्याही घटना घडल्या. या परिस्थितीत एबीपी माझाचे अनेक शिलेदार वादळासंबंधी प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत होते. मुंबई, पुणे, उरण, अलिबाग, रत्नागिरी, श्रीवर्धन, पालघर अशा वादळाचा प्रभाव जास्त असलेल्या ठिकाणाहून एबीपी माझाचे प्रतिनिधी वेळोवेळी अपडेट देत होते. या दरम्यान त्यांना देखील वादळाच्या कहराचा सामना करावा लागला.

'निसर्ग ' चक्रीवादळाची आपल्यापर्यंत समुद्रकिनाऱ्यावर जाऊन माहिती पोहोचवणाऱ्या पत्रकार आणि कॅमेरामन यांना खायलाही मिळालं नाही. त्यांना रात्र गाडीत काढावी लागली. आपल्या जीवाची पर्वा न करता केवळ आपलं हे काम आहे, म्हणून अशा अत्यंत अवघड परिस्थितीत त्यांनी त्या परिसरात दोन दिवस काढले आणि ती बातमी आपल्यापर्यंत पोहोचवली.

याच वादळाचं हरिहरेश्वर इथं वृत्तांकन करायला गेलेले एबीपी माझाचे कोल्हापूर प्रतिनिधी विजय केसरकर हे या वादळाच्या तडाख्यातून थोडक्यात बचावले.  वादळाचं वृत्तांकन करण्यासाठी गेलेले विजय केसरकर आणि कॅमेरामन प्रमोद सावंत यांच्याशी तीन जून रोजी दुपारी बारा वाजल्यापासून अचानक संपर्क तुटला होता. ते यानंतर तब्बल 36 तासानंतर संपर्कात आल्याने जीव भांड्यात पडला. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या घरातल्या लोकांची काय अवस्था झाली असेल. कार्यालयामध्ये किती धांदल उडाली असेल, याबाबत कल्पना न केलेलीच बरी.

भयानक आणि थरकाप उडवणारा अनुभव 

विजय केसरकर आपला भयानक आणि थरकाप उडवणारा अनुभव सांगताना म्हणतात, देवाच्या कृपेने आम्ही सुखरुप आहोत. आम्ही सुदैवाने वाचलो. आम्ही ज्या ठिकाणी राहत होतो त्या हॉटेलचे छतच उडून गेले. आम्ही जवळपास तीन तास एका शौचालयाचा सहारा घेऊन बसून होतो. खिडकीतून आम्ही बाहेर पाहात होतो. बाहेर अनेक घरांवरील पत्रे, झाडं हवेत उडत होते.

आम्ही दुपारी श्रीवर्धनला जाण्यासाठी निघालो. रस्त्याने जात असताना एक झाड रस्त्यावर कोसळलं होतं. तिथून यू टर्न घेत असताना एक भली मोठी फांदी आमच्या गाडीवर पडली. सुदैवाने ती पडताना एका तारेवर अडकली आणि आम्ही खालून निघालो, असं त्यांनी सांगितलं.

आम्ही मग जिथं होतो तिथून आमचा संपर्क 11.30 वाजता तुटला. वादळ इतकं जोरात होतं की, आम्हाला पिलरला घट्ट पकडून उभा राहावं लागलं. त्यात हात सटकल्याने अचानक मी 25 ते 30 फुटापर्यंत मी हवेच्या दाबाने उडत होतो. हा सगळा प्रसंग जीवघेणा होता. या 25 ते 30 सेकंदाच्या काळात सगळे नातेवाईक डोळ्यासमोरुन गेले. हा प्रसंग सांगताना विजय केसरकर यांना अश्रू अनावर झाले. वादळ शांत झाल्यानंतर मी, कॅमेरामन आणि चालक अक्षरशा रडलो. आमचा काहीही कॉन्टॅक्ट होत नव्हता. लोकं देखील प्रचंड घाबरलेले होते, असं विजय केसरकर यांनी सांगितलं.

VIDEO | विजय केसरकर यांचा अनुभव ऐका त्यांच्याकडूनच


गृहराज्यमंत्री म्हणाले 'विजय तू जिंकलास'

एबीपी माझाचे प्रतिनिधी विजय केसरकर यांचा हा जीवघेणा अनुभव ऐकल्यानंतर गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी ट्वीट करत 'विजय, तू जिंकलास' असं म्हटलं आहे. सतेज पाटील यांनी म्हटलंय की, प्रसंग कोणताही असो, तो आपल्याला समजावा म्हणून आपला जीव धोक्यात घालून पत्रकार काम करत असतात. आपल्या नजरेच्या पलीकडे सुरू असलेला त्यांचा हा संघर्ष कित्येकदा आपल्याला दिसत नाही! कोकणातील चक्रीवादळातून अत्यंत धैर्याने सुखरूप बाहेर पडलेल्या एबीपी माझाचा रिपोर्टर आणि आमच्या कोल्हापूरच्या विजय केसरकर ची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी आहे. आज ती पाहताना तोंडातून शब्द आले "जिंकलास विजय तू!" असं त्यांनी म्हटलंय.