सोलापूर: बेधडक आणि रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अजित पवारांनी आजही असंच एक धाडसी विधान केलं. पण चूक लक्षात आल्यानंतर अजितदादांनी सारवासारव केली.

शरद पवार चारवेळा मुख्यमंत्री होऊनही बारामतीमध्ये आरटीओचं कार्यालय आलं नाही. पण मी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते सुरु झालं, असं वक्तव्य अजितदादांनी केलं. पण लगेच त्यांना आपण मोठं विधान केल्याचं लक्षात आलं आणि त्यांनी चूक सुधारली. उद्या लगेच 'शरद पवारांवर अजित पवार घसरले' अशी हेडलाईन करु नका. प्रत्येक भाषणाच्या सुरुवातीला व्यवस्थित बोलायचं ठरवतो, असं म्हणत अजित पवारांनी स्वत:वरही कोटी केली.



अकलूजमध्ये आयोजित राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार बोलत होते.

अजित पवार म्हणाले, "शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री असूनही बारामतीच्या आधी अकलूजमध्ये RTO कार्यालय आले. मग नंतर मी उपमुख्यमंत्री झाल्यावर बारामतीला RTO कार्यालय आणले".

मात्र यानंतर अजित पवारांनी सारवासारव करताना पवार साहेबांना देशाचा आणि राज्याचा व्याप मोठा असल्याने त्यांना या बारीक गोष्टीत लक्ष द्यायला वेळ झाला नसेल, असे सांगत आपली चूक सुधारली. पण लगेच "आता अजित पवार शरद पवार यांच्यावर घसरला" अशी उद्या हेडलाईन नको. प्रत्येक भाषणावेळी व्यवस्थित शब्द वापरायचे, असं म्हणत स्वत:वर कोटी केली.

शिवसेना-मनसेला टोला

यावेळी अजित पवारांनी शिवसेना आणि मनसेवर हल्लाबोल केला. पाकिस्तानी कलाकारांच्या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्यांनी ५ कोटीत तोडपाणी केली काय? असा सवाल त्यांनी मनसेला केला.

बाळासाहेब ठाकरे यांनी पाकिस्तानी खेळाडूंना खेळू न देण्याचा इशारा दिल्यानंतर ते असेपर्यंत पाकिस्तानी खेळाडूंना मुंबईमध्ये खेळू दिले नव्हते, याची आठवण करून देत त्यांनी राज ठाकरेंसह शिवसेनेचाही समाचार घेतला.

अजित पवारांचा सोलापूर दौरा

गेल्या आठवड्यापासून अजित पवार सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी प्रत्येक तालुक्यात जाऊन मेळाव्याचा सपाट लावला आहे. पक्षात सुरु असलेली गटबाजी आणि फोडाफोडीला आवार घालण्यासाठी त्यांनी दौरा सुरु केला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी जिल्ह्यातील इतर मेळाव्याकडे पाठ फिरवली होती. यावेळी अकलूजमध्येच मेळावा घेतल्याने, मोहिते- पाटील यांनी उपस्थिती लावलीच शिवाय पक्षहिताला मारक अशी गटबाजी करणाऱ्याना पाठिशी घालू नका, असा सल्ला अजित पवार यांना दिला.