Ajit Pawar News: राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिर्डीतील अधिवेशनात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सावधगिरीचे सल्ले देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही नाव न घेता टीका केली आहे.  पक्ष बदलणे चूक नाही. आपला पक्ष बदलून वेगळे होऊन मुख्यमंत्री होणे गैर नाही, पण ज्या घरात वाढलो ते घर उध्वस्त करणे ही बेईमानी आहे, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात तुम्ही एकटे लढायचे यासाठी तयारी करा. आपली ताकत असेल तर मित्रपक्ष चर्चा करतील, असंही अजित पवार म्हणाले. 


यावेळी बोलताना अजित पवार यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना सावधगिरीचा सल्ला दिला आहे. ते आपल्या पक्षातील लोकांना पण आमिष दाखवत आहेत, आपल्या लोकांना ही काही सांगत आहेत.  पण त्यांच्या आश्वासनाला बळी पडू नका.  जे पक्ष सोडून गेले त्यांना आता पश्चाताप होत आहे, त्यांना वाटत जे केलं ती चूक झाली. ज्या घरात वाढलो ते घर उध्वस्त करणे योग्य नाही. शिवसेना बाबत जे घडले, नाव गेले हे महाराष्ट्रातील जनतेला आवडलेले नाही, असंही अजित पवारांनी म्हटलं.  
 
आघाडीची वाट पाहत बसण्यापेक्षा स्वबळावर लढण्याची तयारी करा


आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात आघाडीची वाट पाहत बसू नका तो लवकरच होईल मात्र तुम्ही कामाला लागा. आघाडीची वाट पाहत बसण्यापेक्षा स्वबळावर लढण्याची तयारी करा.  आपली ताकद स्थानिक पातळीवर दिसली तरच मित्र पक्ष आपल्यासोबत चर्चा करायला येतील, असं देखील अजित पवार म्हणाले.  महाविकास आघडी सत्तेत कशी येईल हे बघितलं पाहिजे. त्यासाठी पक्ष मजबूत केला पाहिजे. यासाठी कार्यकर्त्यांनी काम केले पाहिजे, असं देखील अजित पवार म्हणाले. 
 
अजित पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना काय म्हणाले?


अजित पवार म्हणाले की. आपल्याला विधान परिषदेच्या पाच जागा निवडून आणायच्या आहेत. यासाठी आतापासून कार्यकर्त्यांनी कामाला लागावं.  फेब्रुवारी 2023 मध्ये पाच विधानपरिषद निवडणुका आहेत. औरंगाबाद शिक्षक, कोकण शिक्षक, नाशिक पदवीधर, नागपूर शिक्षक, अमरावती पदवीधर या निवडणुका पार पडणार आहेत. आपला नागपूर आणि अमरावती येथे आमदार नाही. आपल्याला या जागा मिळवायच्या आहेत. औरंगाबाद राष्ट्रवादीकडे आहे. कोकण शिक्षक मतदार संघाची जागा मित्र पक्षाकडे आहे. मित्र पक्ष काँग्रेसकडे नाशिकची जागा आहे. अमरावतीची जागा विरोधकाकडे आहे. आपल्याकडे या जागेसाठी उमेदवार आहे.  याबाबत मित्र पक्षांसोबत चर्चा करू, असंही अजित पवार म्हणाले.