Ajit Pawar On Eknath Shinde : सध्या गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. या दरम्यान अनेक नेतेमंडळींकडील गणेशोत्सवाला दिग्गजांची हजेरी लागताना दिसत आहे. यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) देखील अनेकांच्या घरच्या गणपतींचं दर्शन घेताना दिसत आहेत. यावरुन राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्र्यांवर नाव न घेता निशाणा साधला आहे. अजित पवारांनी अहमदनगरमध्ये (Ajit Pawar In Ahmednagar) बोलताना म्हटलं की, गणेश उत्सव हा वर्षानुवर्ष चालत आलेला आहे. पण याआधी कोणीही एवढ्या मोठ्या प्रमाणावर गणपतीच्या दर्शनाला जात नव्हते. आम्हीही गणपतीच्या दर्शनाला जातो, मात्र मीडियाचे कॅमेरे सोबत घेऊन जात नाही. काही लोकांना शो करण्याची सवय आहे. पूर्वी राजकुमार शो मॅन होते तसे काही शो मॅन आता झाले आहेत, अशी टीका अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. 


'दसरा मेळावा झाल्यानंतर लक्षात येईल खरी शिवसेना कोणाची?'


शिवतीर्थ मैदानासंदर्भामध्ये बोलताना अजित पवार म्हणाले की, दोघांनाही दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागण्याचा अधिकार आहे. वर्षानुवर्ष महाराष्ट्रातील जनता पाहत होती की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शिवतीर्थावरच दसरा मेळावा घ्यायचे. याच शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की ही शिवसेना यापुढे उद्धव ठाकरे पाहतील. मात्र सध्याच्या राजकीय घडामोडी घडल्यात, ते सगळ्यांनी पाहिलं आहे. ज्यांच्या हातात सत्ता असते ते त्यांना पाहिजे त्या पद्धतीने निर्णय घेतात. पण दसरा मेळावा झाल्यानंतर लक्षात येईल खरी शिवसेना कोणाची असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.


काँग्रेसचे आमदार फुटण्याच्या चर्चेसंदर्भात अजित पवार म्हणाले...


काँग्रेसचे आमदार फुटण्याच्या चर्चेसंदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले की, याबाबत खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्पष्ट केले की काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्याशी त्यांची भेट झालेली नाही. सध्या मीडियाला कोणत्याही बातम्या नाहीत म्हणून अशा बातम्या दिल्या जात असल्याचे पवार म्हणाले.
 
राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत सध्या जे सुरू आहे ते लोकशाहीला धरून सुरू आहे का? याचा विचार व्हायला हवा असं अजित पवारांनी म्हटले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


ठाकरेंना शिंदेंचा पुन्हा धक्का! राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी दिलेली यादी शिंदे सरकारनं मागे घेतली


एकनाथ शिंदेंच्या 'शिवतीर्थ' भेटीवर खासदार श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले...