Ajit Pawar on Charging Station : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी चार्जिंग स्टेशन्सच्या संदर्भात महत्वाचं वक्तव्य केलं आहे. पेट्रोल पंपांवर चार्जिंग स्टेशन टाकणार असून चांद्यापासून बांद्यापर्यंत आता प्रत्येक पेट्रोल पंपांवर चार्जिंग स्टेशन सुरू करावे लागणार आहे. केंद्र सरकारने तसं धोरण आखले आहे, असं अजित पवार म्हणाले. पुरंदर तालुक्यातील निंबूत येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या समता पॅलेस वातानुकूलित नुतन वस्तूच्या उद्घाटन समारंभात अजित पवार बोलत होते. 


नीरा डावा आणि नीरा उजवा कालवा जूनपर्यंत बंद होणार नाही


अजित पवार पुढं बोलताना म्हणाले की, काल कालवा सल्लागार समितीची आढावा बैठक झाली. नीरा डावा आणि नीरा उजवा कालवा जूनपर्यंत बंद होणार नाही असा निर्णय आम्ही घेतला आहे. परंतु पाणी आहे म्हणून आहे दिसेल तिथे कांडे दाबत बसू नका.  ज्यांनी नियमितपणे कर्ज भरले आहे त्यांना आम्ही 50 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी लावलेला ऊस वेळेत गेला पाहिजे याची खबरदारी आम्ही घेत आहोत, असंही ते म्हणाले. 


भाजप, वायएसआर, सपाचे 15 खासदार बारामती दौऱ्यावर 


अजित पवार यांनी सांगितलं की, कालपासून भाजप, वायएसआर, सपाचे 15 खासदार हे बारामती दौऱ्यावर आहेत. ते बारामतीतील विकास कामांची पाहणी करीत आहेत.  विविध पक्षाचे 15 खासदार बारामती दौऱ्यावर आहेत. यात भाजप, बसपा, तृणमूल काँग्रेस, वायएसआर काँग्रेस आणि सपा या पक्षाचे हे खासदार आहेत, अशी माहिती अजित पवारांनी दिली. 


जिल्हा नियोजन आराखड्यातील 5 टक्के निधी ग्रामीण भागातील शाळा सुधारणा करण्यासाठी


दिल्लीमध्ये महापालिकेच्या शाळांचा दर्जा चांगल्या झाल्या. सांगलीमध्ये देखील शाळा चांगल्या झाल्यात. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळांचा दर्जा कसा चांगला होईल. यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना घेऊन बसणार आहे. सोबतच जिल्हा नियोजन आराखड्यातील 5 टक्के निधी हा ग्रामीण भागातील शाळा सुधारणा करण्यासाठी वापरणार असल्याचं अजित पवार म्हणाले.