बारामती :  बारामती बँकेवर जे संचालक म्हणून निवडून येतील त्यांनी स्वतःसाठी बँकेतून कर्ज घ्यायचे नाही आणि नातेवाईकांना देखील कर्ज घेऊन द्यायचं नाही. तसे असेल तरच  निवडणुकीली उभा राहा असा सज्जड दम अजित पवारांनी आज उमेदवारांना भरला आहे. उपमुख्यमंत्री  अजित पवारांनी आज बारामतीतील राष्ट्रवादी भवनात कार्यकर्ता मेळावा घेतला आहे तेव्हा अजित पवार बोलत होते


दि बारामती सहकार बँकेची पंचवार्षिक निवडणूक आहे. 15 जागांसाठी जवळपास राष्ट्रवादीच्या पॅनेल कडून 85 पेक्षा जास्त अर्ज आले आहेत.  बारामती बँकेच्या राज्यभरात 36 शाखा आहेत. राष्ट्रवादीकडून प्रगती सहकार पॅनेल उभे करण्यात आलं आहे. जर संचालक म्हणून निवडून आलात तर स्वतःसाठी आणि नातेवाईकांना बँकेतून कर्ज घेऊन देता येणार नाही. जर तसं असेल तरच बँकेच्या संचालक पदासाठी उभे राहा असे आवाहन अजित पवारांनी इच्छुक उमेदवारांना केले आहे.  


राज्यातील अनेक जिल्हा बँकामधील निवडून आलेले संचालक आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करुन आपल्या गोतावळ्यामध्येच कर्जाचं वाटप करत असल्याचं दिसून येतंय. कुटुंबियांच्या आणि नातेवाईकांच्या नावाने कर्ज काढायचं, जवळच्या लोकांना भरमसाठी कर्जाचं वाटप करायचं अशा प्रकारामुळे राज्यातील अनेक जिल्हा बँका तोट्यात आल्या आहेत. तसेच नातेवाईकांना दिलेल्या कर्जाचा परतावा होत नसल्याने ते कर्ज एनपीएमध्ये जात असल्याचंही समोर येतंय. त्यावर वेळोवेळी सत्ताधाऱ्यांकडून या बँकांची कर्ज माफ केली जातात. याचा फायदा हा संचालकांना आणि राजकारणाला होत असला तरी यामध्ये ठेवी असलेल्या सर्वसामान्य ठेवीदारांचे मात्र नुकसान होत आहे.


अहमदनगर येथील नगर अर्बन को-ऑप बँकेवर रिझर्व बँकेने निर्बंध लागू केले आहेत. आज तसे पत्र RBI ने प्रसारित केले आहे. अर्बन बँकेला RBI च्या परवानगी शिवाय कुठेही गुंतवणूक करता येणार नाही तसेच कोणत्याही मालमत्तेची विक्री किंवा खरेदी करता येणार नाहीये. याशिवाह खातेदारांना 10,000 पेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाहीये असे निर्बंध अर्बन बँकेवर लागू करण्यात आले आहे. त्यामुळे बँकेच्या अडचणीत वाढ झाली असून अहमदनगर जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली आहे. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



संबंधित बातम्या