Ajit Pawar : आमदार संग्राम जगताप यांनी केलेलं वक्तव्य हे पक्षाच्या विचारधारेला धरुन नसल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. याबद्दल आम्हाला नोटीस काढावी लागेल, असं मी काल सांगितलं होतं. त्या पद्धतीने नोटीस काढली असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. शेवटी तुम्ही एका राजकीय पक्षाचे सदस्य असाल, सभासद असाल तर त्या पक्षाच्या विचारधारेबद्दल काहीही बोलायला लागला तर कोणताही पक्ष सहन करणार नाही असे अजित पवार म्हणाले.  

Continues below advertisement


दिलेल्या नोटीसला उत्तर आल्यानंतर निर्णय घेऊ 


नोटीस काढल्यावर त्याला प्रक्रिया असते. त्या नोटीसला काय उत्तर येते ते उत्तर आल्यानंतर आम्ही निर्णय घेऊ असे अजित पवार म्हणाले. पूरग्रस्त भागात मोठ्या लहान उसाचे नुकसान झाले आहे. त्यासंदर्भात पुढची कार्यवाही काय करायची याची माहिती देण्यात आली आहे. साखर कारखान्यांना याबाबतची सर्व माहिती दिली जाणार आहे. कुठलाही निर्णय झाला तरी वेगवेगळे मतप्रवाह असतात. दरम्यान, दिवाळच्या आधी शेतकऱ्यांना मदत देणार असल्याचे अजित पवार म्हणाले. मी उद्या मुंबईला जाणार आहे. उद्या मुख्य सचिवांची भेट घेणार आहे. ज्या पूरग्रस्त भागातील अहवाल आले आहेत, त्याबाबत आम्ही निर्णय घेऊ असे अजित पवार म्हणाले. 


नेमकं काय म्हणाले होते संग्राम जगताप?


अहिल्यानगरमध्ये गुरुवारी एमआयएम पक्षाचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा झाली. या सभेत एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आमदार संग्राम जगताप यांच्यावर टीकेची झोड उठवली. आधी एक छोटासा चिंटू होता, आता चिकणी चमेली आली आहे, असे म्हणत संग्राम जगताप यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. त्यानंतर हिंद जन आक्रोश मोर्चात संग्राम जगताप (Sangram jagtap) यांनी मोर्चाला आवाहन करताना दिवाळीची (Diwali) खरेदी हिंदूंकडून करण्याची विनंती केली आहे. येणाऱ्या दिपावली सणाच्या निमित्ताने प्रत्येक नागरिकांनी खरेदी फक्त हिंदू लोकांच्याच दुकानातून करावी. आपल्या दीपावली खरेदीचा नफा केवळ हिंदू लोकांनाच मिळायला हवा, असेही त्यांनी म्हटले.


दिपावली सणाच्या निमित्ताने प्रत्येक नागरिकांनी खरेदी फक्त हिंदू लोकांच्याच दुकानातून करावी. आपल्या दीपावली खरेदीचा नफा केवळ हिंदू लोकांनाच मिळायला हवा. सध्या हिंदू मंदिरात अथवा हिंदूंवर होणारे हल्ले हे मशिमधून घडत आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे. विशेष म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यात एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा झाल्यानंतर संग्राम जगताप यांनी आज केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.


 



महत्वाच्या बातम्या:


दिवाळीची खरेदी हिंदूंकडूनच करा; अहिल्यानगरमधील सभेनंतर अजित पवारांच्या आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य