मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर महायुतीमधील जागावाटपाचा (Mahayuti Seat Sharing) निर्णय अंतिम टप्प्यात आला असून, आता सर्वच उमेदवारांच्या नावाची यादी (NCP Candidate List) देखील जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. अशात अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीला महायुतीत 5 पेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील (Lok Sabha Elections First Phase) एकही जागा राष्ट्रवादीकडे नाही. तसेच, काही जागांवर अजूनही चर्चा सुरूच असल्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली आहे. दरम्यान, 28 मार्चला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची यादी जाहीर होण्याची शक्यता असल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे. 


मागील काही दिवसांपासून महायुतीमधील पक्षात जागावाटपाच्या मुद्यावरून बैठकांवर बैठका सुरु आहे. स्थानिक पातळीवर तोडगा निघत नसल्याने तीनही पक्षातील नेत्यांनी दिल्लीवारी करत थेट दिल्लीत देखील बैठका घेतल्या. मात्र, अजूनही यावर पूर्णपणे कोणताही अंतिम निर्णय होऊ शकला नाही. मात्र, पुढील दोन दिवसांत महायुतीमधील जागावाटपाचा निर्णय होण्याची शक्यता असून, त्यानुसार 28 मार्च रोजी अजित पवारांकडून राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा होऊ शकते. 


राष्ट्रवादीला 5 पेक्षा अधिक जागा मिळणार? 


महायुतीत जागावाटपाच्या निर्णय अंतिम टप्प्यात आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाने 9 जागांची मागणी केली होती. मात्र, भाजपकडून एवढ्या जागा देण्याची शक्यता कमी आहे. काही जागांवर राष्ट्रवादीने दावा केला असून, त्या जागा भाजप आणि शिवसेनेला देखील हव्या आहेत. त्यामुळे जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याची माहिती आहे. अशात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीत 5 पेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागावाटपाच्या अंतिम निर्णयाकडे तीनही पक्षातील इच्छुकांचे लक्ष लागून आहे. 


शिवाजीराव आढळराव उद्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार...


महायुतीत शिरूर लोकसभा मतदारसंघ अजित पवारांच्या वाट्याला येण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघातून महायुतीकडून शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. त्यामुळे त्यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करावा लागणार असून, उद्या संध्याकाळी चार वाजता मंचर येथील शिवगिरी मंगल कार्यालयात शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे. या प्रवेशाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार दिलीप मोहिते हे उपस्थित राहणार आहेत. उद्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पक्ष प्रवेश झाल्यानंतर ते महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून शिरूर लोकसभेसाठी उभे राहताना पाहायला मिळतील. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


आता तर माघार नाहीच, बारामतीबाबत शिवतारेंचं एकदम फुल्ल अँड फायनल; 1 एप्रिलला जाहीर सभा