मुंबई : माजी मंत्री नवाब मलिक यांची प्रकृती (Nawab Malik Health) अचानकपणे बिघडली आहे. प्रकृती बिघडल्याने त्यांना कुर्ला येथील क्रिटिकेअर सेंटर रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आलं आहे. नवाब मलिक (Nawab Malik) नेमकं कोणत्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल झाले आहेत, हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र सध्या त्यांच्यावर उपचार चालू आहेत. 


नवाब मलिक यांच्यावर उपचार 


नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये ते मंत्री राहिलेले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड केल्यानंतर त्यांनी अजित पवार यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला. काही महिन्यांपूर्वी ते तुरुंगातून बाहेर आहेत. तेव्हापासून ते सार्वजनिक कार्यक्रमात फारसे दिसलेले नाहीत. त्यानंतर आता त्यांची प्रकृती ठिक नसल्याचे समोर आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार चालू आहेत. 


प्रकृतीचे कारण देत मागितला होता जामीन 


नवाब मलिक यांना ईडीने 2022 मध्ये गोवावाला कंपाऊंड प्रकरणात मनी लाँड्रिंग कायद्याखाली अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात होते. नंतर ऑगस्ट 2023 मध्ये ते अटीशर्तीसह जामिनावर तुरुंगातून बाहेर आले होते. प्रकृतीचे कारण देत जामीन मिळावा अशी मागणी तेव्हा त्यांनी केली होती.  क्रूझ ड्रग्ज प्रकरणादरम्यान मलिक चांगलेच चर्चेत आले होते. या प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आरोपी होता. मात्र  एनसीबीचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर मलिक यांनी गंभीर आरोप केले होते. या आरोपांमुळे मलिक तेव्हा चर्चेचा विषय ठरले होते.  


अगोदर तटस्थ भूमिका, पण नंतर...


नवाब मलिक तुरुंगातून बाहेर आले तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस दोन गटांत विभागलेली होती. त्यामुळे ते कोणत्या गटात सामील होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. सुरुवातीला त्यांनी तटस्थ भूमिक घेतली होती. नंतर मात्र त्यांनी अजित पवार गटाला साथ देण्याचा निर्णय घेतला. सध्या ते अजित पवार गटात आहेत.


दिलीप वळसे पाटील यांचा अपघात 


राष्ट्रादीचे नेते गटातील दिलीप वळसे पाटील यांचादेखील अपघात झाला आहे. वळसे पाटील 27 मार्च रोजी घरातील पायऱ्यांवर पाय घसरून पडल्याने त्यांच्या डाव्या मांडीचे हाड व डाव्या हाताचे मनगट फ्रॅक्टच  झाले आहे. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिलेला आहे.  दिलीप वळसे पाटील हेदेखील अजित पवार यांच्या गटातीलच नेते आहेत. मात्र वळसे पाटलांचा अपघात झाल्याचे समजताच खासदार शरद पवार यांनी वळसे पाटलांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. 


हेही वाचा >>>


दिलीप वळसे पाटील पाय घसरुन पडल्यानं रुग्णालयात, शरद पवारांकडून फोनवरुन विचारपूस