Ajit Pawar NCP : राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी आज अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांचा अर्ज दाखल करण्यात आला. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा अर्ज दाखल करताना अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि आमदार नरहरी झिरवळ उपस्थित होते. मात्र, सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना सत्ताधारी महायुतीमधील अन्य कोणताही नेता उपस्थित नसल्याने राजकीय भूवया उंचावल्या गेल्या आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये अजित पवार एकटे पडले आहेत का? अशी चर्चा सुरू झाली आहे. 


महायुतीचे अनेक नेते मुंबईत हजर


दुसरीकडे, सुनेत्रा पवारांचा अर्ज दाखल केला जात असतानाच महायुतीचे अनेक नेते मुंबईत हजर असतानाही विधानभवनात अर्ज भरण्यासाठी मात्र कुणीच हजर नव्हते. यामुळे महायुतीत सारं काही आलबेल नसल्याचे दिसते. 


लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाला अपेक्षित यश नाही


गेल्या काही दिवसांपासून राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागेवरून अजित पवार गटांमध्ये रस्सीखेच सुरु होती. या जागेवर कोणाला संधी मिळणार अशी चर्चा असतानाच सुनेत्रा पवारांना संधी देण्यात यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती. आता अजित पवारांनी थेट सुनेत्रा पवार यांना संधी दिल्याने बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांना टक्कर देण्यासाठी ही खेळी असल्याचे बोलले जात आहे. मात्र, महायुतीमधील नेत्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरला. 


लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाला अपेक्षित यश मिळालेलं नाही. जागावाटपामध्ये अवघ्या चार जागा मिळाल्या होत्या. मात्र, चार पैकी तीन उमेदवार पराभूत झाले आहेत, केवळ प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे रायगडमधून निवडून आल्याने अजित पवार गटाला इभ्रत राखली गेली. मात्र, धाराशिव, बारामती आणि शिरूरमधून पराभवाला सामोरे जावे लागले. बारामतीची लोकसभा निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची करून सुद्धा हाती निराशा आली आहे. त्यामुळे अजित पवारांच्या महायुतीमधील राजकीय अस्तित्वाची चर्चा सुरू झाली आहे. 


अजित पवार गटाला मंत्रीपद मिळालं नाही


विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार गट स्वतंत्र भूमिका घेणार का? अशी सुद्धा चर्चा रंगली आहे. दुसरीकडे, राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाला एक राज्यमंत्रीपद मिळालं आहे. मात्र, अजित पवार गटाकडून कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी करण्यात आली होती. मात्र, अजित पवार गटाला कॅबिनेट मंत्रीपद मिळालं नाही. त्यामुळे अजित पवार गटाकडून ताकद लावून सुद्धा केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही. त्यामुळे सुद्धा राष्ट्रवादीमध्ये नाराजीचा सूर आहे. 


दुसरीकडे, छगन भुजबळ यांनी सुद्धा आत्तापासून जागावाटपाचा मुद्दा उपस्थित करत विधानसभेला 80 ते 90 जागा मिळाल्या पाहिजेत, अशी मागणी केली आहे. शिंदे गटाला जितक्या जागा मिळतील, तितक्या जागा आम्हाला मिळाव्यात असे भुजबळ यांनी वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या 25व्या मेळाव्यात बोलताना केले होते. त्यामुळे महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या