Ajit Pawar on Corona Restrictions : पुण्यातील कोरोना परिस्थिती आता आटोक्यात आली आहे. पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट 15 टक्के असून राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट  9 टक्के. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून राज्यातील कोरोनाचे नियम लवकरच शिथिल करणार, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते. 


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी विविध मुद्द्यांवर आपली बाजू मांडली. ते म्हणाले, "शिवजयंती साजरी  करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलून नियमात शिथिलता आणणार आहे. 19 फेब्रुवारीला शिवनेरी किल्ल्यावर साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला मी आणि आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहोत" प्रवास करण्यास मनाई असल्यामुळे मुख्यमंत्री उपस्थित राहणार नाहीत, अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली. 


"कोवॅक्सिन लसीचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे 15 ते 18 वयोगटालीत लसीकरणाचा वेग सध्या मंदावला आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी केंद्रासोबत चर्चा करणार आहे. त्याचबरोबर सध्या थिएटरमधे 50 टक्के प्रेक्षकांना उपस्थित राहण्यास परवानगी आहे. परंतु, मुख्यमंत्र्यांशी बोलून यामधेही शिथिलता आणणार आहे. 


किरीट सोमय्या यांच्या आरोपांना उत्तर 


पुण्यातील कोविड सेंटरमध्ये कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार झाला असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यांच्या आरोपांना अजित पवार यांनी यावेळी उत्तर दिले. "पुण्यात एक आणि पिंपरी-चिंचवडमधे एक अशी दोन जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आली होती. या दोन्ही कोविड सेंटरची कामं पारदर्शीपणे केली आहेत. शिवाय दोन्ही कोविड सेंटरमध्ये कोणत्याही राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप नव्हता. कोविड सेंटरची सर्व जबाबदारी अधिकाऱ्यांवर होती. मात्र, या जम्बो कोवीड सेंटरबाबत आरोप होत असल्याने आयुक्तांना याबाबत नोट काढण्यास सांगितले आहे. पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमधे कोणतीही चुकीची गोष्ट झालेली नाही, अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली.  


"धुक्यामुळे यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता. तो आता सुरळीत झाला आहे, असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.  


महत्वाच्या बातम्या