बारामती : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार एका कार्यक्रमात व्यसनाधीनतेवर बोलत असतानाच एक दारुडा त्यांच्या समोरून गेल्याने त्यांनी डोक्यावर हात मारून घेतला. ब्रह्मदेवा तू खाली आला तरीही लोक सुधारायची नाहीत असे म्हणत अजित पवार यांनी डोक्यावर हात मारुन घेतला.


अजित पवार काल सायंकाळी इंदापूर तालुक्यातील काझड या गावात विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यासाठी आले होते.  यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अजित पवार यांना एक निवेदन आले होते. त्या निवेदनात अवैध पद्धतीने होणारी दारूबंदी बंद व्हावी अशी मागणी करण्यात आली होती. यावर पवार यांनी या गावात दारू विकली जाते हे वाईट असून व्यसनाधीन होऊ नका असा सल्ला दिला.


अजित पवार यांचे भाषण सुरू असताना अचानक एक दारूडा डुलत डुलत चक्क मंचासमोरून निघाला.  हे पाहताच अजित पवार यांना आश्चर्य वाटले.  पवार यांनी व्यसनाधीन होऊ नका असे सांगत स्वर्गीय आर आर पाटील यांचे उदाहरण दिले होते. मात्र एवढेच सांगून देखील त्यांच्यासमोर तेही भाषणादरम्यान आलेल्या या तळीरामाला बघत पवार यांनी डोक्यावर हात मारुन घेतला. त्या तळीरामाला बघत पवार यांनी 'हा काय चंद्रावरती गेला वाटतं, एवढ भाषणं करून देखील माझ्यासमोरच हा डुलत डुलत आलाय. आता काय करायचं, कधी कधी वाटतं ब्रह्मदेवा तू खाली आला तरीही ही लोकं सुधारायची नाहीत, असे म्हणतात सभेत एकच हशा पिकला.