Ajit Pawar Exclusive: आज राज्याचा (Maharashtra News) अर्थसंकल्प (Budget 2023) सादर होणार आहे. हा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी राज्याच्या अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोठ्या अपेक्षाही आहेत. मात्र या सर्व पार्श्वभूमीवर बजेटकडून माजी अर्थमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना आम्ही बोलतं केलं. राज्याच्या अर्थसंकल्पाकडून अजित दादांच्या काय अपेक्षा आहेत? अर्थसंकल्प आणि त्यातलं राजकारण याबाबत अजित पवार काय म्हणातयत? निधिवाटपात सत्तेतल्या पक्षांबाबत सापत्न वागणूक होते का? अजित पवारांवर होत असलेल्या आरोपांबाबत ते काय म्हणतात? या सर्व प्रश्नांवर आम्ही अगदी अर्थसंकल्पाच्या काही तास आधीच अजित दादांना बोलतं केलं आणि आमच्या सर्व प्रश्नांना दादांनीही रोखठोक उत्तरं दिली. जाणून घ्या अजित पवार मुलाखतीत नेमकं काय म्हणाले? 


काही दिवसांपूर्वी ईशान्येकडील राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला यश मिळालं. नागालँडमध्ये राष्ट्रवादीच्या सात उमेदवारांचा विजय झाला. याबाबत विचारल्यावर अजित पवारांनी प्रश्नाला बगल दिली. नागालँडचा निर्णय महाराष्ट्र बाहेरचा होता, तो वरिष्ठांनी घेतला मी त्यात नसतो, असं म्हणत पवारांनी प्रश्नाला बगल दिली. मी राजकारणात आल्यापासून मी महाराष्ट्राशी संबंधित मुद्द्यांमध्ये लक्ष दिलं आहे. राष्ट्रीय पातळीवरच्या प्रश्नांमध्ये मी लक्ष देत नाही, तिथे वरिष्ठ निर्णय घेतात, असं अजित पवार म्हणाले. तसेच, ज्यावेळी पक्षातील सर्वोच्च नेते एखाद्या गोष्टीबाबत भूमिका मांडतात. त्यावेळी आम्ही त्यावर काहीच प्रतिक्रिया देत नाही. महाराष्ट्राबाबत काही असेल, तर मी त्यासंदर्भात भूमिका मांडू शकतो पण तुम्ही एक लक्षात घ्या कुठलाही पक्ष असो वरिष्ठ जे ठरवतात, तिच पक्षाची भूमिका असते. त्यामुळे नागालँडबाबतचा निर्णय घेताना वरिष्ठ पातळीवर चर्चा झालीच असेल, असं दादा म्हणाले. 


काही विभाग असतात जिथे काटछाट करुन चालतच नाही : अजित पवार 


आज अर्थसंकल्प सादर होताना तुमच्या ती अपेक्षा कोणत्या या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले की, "लोकाभिमुख कारभार म्हणजे काय? नुसती भाषणं देऊन चालत नाही. सर्वसामान्य माणसाला जिथे समाधानानं जगता येईल अशा प्रकारच्या गोष्टी करायच्या असतात. जसं महाविकास आघाडी सरकारच्या काळात कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला होता. असा निर्णय घेतल्यानंतर सहाजिकच बजेटवर ताण येतो. अर्थविभागावर ताण येतो. पण शेतकऱ्यांना मदत करणंही गरजेचं आहे. काही विभाग असतात जिथे काटछाट करुन चालतच नाही." पुढे बोलताना ते म्हणाले की, "महागाई कमी होण्याच्या दृष्टीकोनातून आणि सर्वसामान्य माणसाला जीवन जगणं सुसह्य होईल अशा अर्थसंकल्पात तरतूदी असल्या पाहिजेत."


निधीबाबत अजित पवारांवर होणारे आरोप खरे की, खोटे? 


"अर्थसंकल्प सादर करताना आपल्या विचाराचं सरकार असेल तर थोडसं झुकतं माप दिलं जातं. शेवटी मनुष्य स्वभाव असतो. राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना 36 जिल्ह्यांचा विचार करावा लागतो. त्यावेळी थोडसं इकडे-तिकडे तिथंही होतं. ज्यांच्या पक्षाचं सरकार असतं त्यांच्या पक्षाच्या लोकांना निधी जरा जास्तीचा जातो. काही प्रमाणात होतं मी मान्य करतो. पण याचा अर्थ सत्तेत असताना विरोधकांना काहीच द्यायचं नाही, असं नाही होत.", असं अजित पवार म्हणाले. 


निधी विभागानुसार ठरतो, पक्षानुसार नाही : अजित पवार 


पुढे बोलताना ते म्हणाले की, "निधीबाबत माझ्यावर करण्यात आलेला आरोप धादांत खोटा होता. एकनाथ शिंदेंसोबत जो गट गेला. त्यांना आम्ही का गेलो, त्यासाठी काहीतरी कारणं पाहिजेत. खरं तर गेल्या अधिवेशनात शेवटच्या क्षणी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना 50 कोटी रुपयांचा निधी विकासकामांसाठी दिला होता. पण कारण नसतानाही याबाबत आरोप करण्यात आला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस विरोधीपक्षनेते होते. त्यावेळी ते म्हणायचे, राष्ट्रवादीच्या विभागाला इतके पैसे, काँग्रेसच्या विभागाला इतके पैसे आणि शिवसेनेला इतकी रक्कम अशी वक्तव्य करायचे. पण खरं सांगायचं झालं तर, जवळपास 83 टक्के रक्कम ही देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या मंत्र्यांना देण्यात आली आहे. तर शिंदेंना 17 टक्के रक्कमच देण्यात आली. शेवटी कोणतं खातं कोणाकडे आहे, यावरही ते अवलंबून असतं. जलसंपदा, नगरविकास, ग्रामविकास, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण खातं या विभागांना तुम्हाला निधी द्यावाच लागतो. त्याशिवाय विकास तुम्ही करु शकत नाही. आताच्या काळातही आम्ही म्हणायचं का? शिंदे गटाला कमी पैसे मिळाले आणि भाजपनं सर्वाधिक पैसे घेतले. पण तसं नाही ना."


संजय राऊतांच्या हक्कभंगावर बोलताना अजित पवार म्हणाले की, "त्यांचे लेखी उत्तर आलं की मग निर्णय खरा घेता येईल. पण तरीही सरकारमधील जे काही मान्यवर आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे? हेच शेवटी महत्त्वाचं आहे." आता ज्यांच्याबद्दल हक्कभंग आहे, ते म्हणतायत की, विधीमंडळ हे चोरमंडळ आहे. त्यानंतर प्रतिक्रिया उमटल्यानंतर सगळं विधीमंडळ नाहीतर त्यापैकी काही लोक चोरमंडळ आहे, असं ते म्हणाले असं मीसुद्धा ऐकलं. ते त्यांच्या पद्धतीनं सांगतात. पण त्यांची भूमिकाही जाणून घेणं महत्त्वाचं आहे. कारण तेदेखील राज्यसभेचे खासदार आहेत."


गेल्या सात आठ महिन्यात जे काही घडलं त्यामुळे शत्रुता वाढली : अजित पवार 


"गेल्या सात आठ महिन्यात जे काही घडलं त्यामुळे शत्रुता वाढली आहे. अरेला कारे करण्याची पद्धत पडली आहे, जी आधी नव्हती. संविधानानं दिलेला अधिकाराचा चुकीचा वापर सुरू आहे. पक्षातील ज्येष्ठांनी आपापल्या लोकांचे कान टोचून अशी भाषा वापरनं चूक हे करण्याची गरज आहे.", असंही अजित पवार म्हणाले. 


"सुरुवातीला जे म्हणत होते की, जे काही होतंय हे त्यांच्या पक्षाच्या आत होतंय, ते आता म्हणत आहे की, आम्ही याला फोन केला, त्याला फोन केला. इथं पाठवलं, तिथे पाठवलं, तेव्हा तर आमचा काही संबंध नाही म्हणत होते. पण अशा गोष्टी पोटात राहत नाही. आता होळीच्या आधी तुम्ही म्हटलं की, त्यांना माफ केलं हाच आमचा बदला. अरे तुम्ही त्यांचा पक्ष फोडला, त्यांची लोक नेली आणि आता म्हणता माफ केलं. त्यांना काय वाटत असेल? याचा विचार करा.", असंही अजित पवार म्हणाले. 


माझे मुख्यमंत्री पदाचे होर्डिंग्स म्हणजे... : अजित पवार 


"मुख्यमंत्र्यांचे होर्डिंग आमच्या घरासमोर लावणं हा कोणाचा तरी चाबरेपणा आहे. ज्याला आम्ही 'हौसे नवसे गौसे' असं गावाच्या भाषेत म्हणतो. मुख्यमंत्री तोच होणार ज्याच्याकडे 145 चा आकडा आहे.", असं अजित पवार म्हणाले. 


अजित पवार नाराज आहे का? : अजित पवार 


"मी नाराज आहे, असा आरोप किंवा माझ्यावर शंका घेण्याचं कारण असू शकतं ते म्हणजे मी जे फडणवीसांबरोबर सरकार स्थापन केलं ते. त्याला तुम्ही लोक पहाट म्हणतात मी आठ वाजताला सकाळी म्हणतो. माझ्यासाठी पहाट ही चार वाजताची आहे. मी माझ्यावर आरोप होत राहतात त्याकडे दुर्लक्ष करतो." , असं अजित पवार म्हणाले. 


देवेंद्र फडणवीस यांना जेलमध्ये टाकण्याचा प्लान माझ्यासमोर झाला नाही : अजित पवार 


"मी सरकारमध्ये काम करत असताना माझ्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांना जेलमध्ये टाकण्यासंदर्भातील कोणतीही मिटिंग झालेली नाही. त्यांच्याकडे आता गृहखातं आहे, मागेही होतं, पण त्यांना कोणत्या सूत्रांकडून माहिती मिळाली हे माहिती नाही.", असं अजित पवार म्हणाले. मी माझ्याकडे जे खातं नाही, त्यांच्या कामात ढवळाढवळ करत नाही, असं म्हणत या प्रश्नाला नकार देण्याससुद्धा त्यांनी टाळलं.