कोपर्डी बलात्कार: तुमची -आमची मुलगी समजून कारवाई करा : अजित पवार
एबीपी माझा वेब टीम | 18 Jul 2016 06:44 AM (IST)
मुंबई: विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस कोपर्डी बलात्कारामुळे चांगलाच वादळी ठरला.मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी याबाबत निवेदन दिल्यानंतर विरोधकांनी चांगलचं रान पेटवलं. केवळ निवेदन देऊन संपवण्यासारखा हा विषय नसून चर्चा करुन कठोर कायदा व्हायला हवा, अशा शब्दात विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना धारेवर धरलं. दिल्लीतल्या निर्भया बलात्काराइतकीच ही घटना गंभीर असून, राज्यात अशा घटना घडल्यानं निवडून आल्याचीही लाज वाटते, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवारांनी घटनेचा निषेध केला. यानंतर मुख्यमंत्र्यांनीही चर्चेची तयारी दर्शवली. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना तातडीने शिक्षा करावी, अशी मागणी अजित पवारांनी केली. "आजपर्यंत राज्यात ज्या घटना घडल्या, त्यापेक्षा ही घटना वेगळी आहे. जसं दिल्लीत निर्भयाकांड झालं, त्यापेक्षा भयंकर कृत्य नगरमधील कर्जतच्या कोपर्डीत घडलं. चिमुकल्या मुलीवर पाशवी बलात्कार करुन, तिच्या गुप्तांगाची विटंबना केली. हे कृत्य इतकं भयंकर होतं की अंगावर शहारे उभे राहतील", असं अजित पवार म्हणाले. तुमच्या आमच्या घरातील मुलगी समजा आणि तातडीने कारवाईला लागा, अशी मागणी अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. याप्रकरणी आम्हाला राजकारण करायचं नाही. जिथे राजकारण करायचं तिथे करु. पण हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. ही घटना घडल्यानंतर पोलिस कधी घटनास्थळी गेले? असं कृत्य घडतंच कसं? याप्रकरणी कायदे कडक केले पाहिजेत. भविष्यात आया-बहिणीकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाची हिम्मत झाली नसली पाहिजे, असं अजित पवारांनी ठणकावून सांगितलं. कोपर्डीत चिमुकलीवर पाशवी बलात्कार कर्जतमधील कोपर्डी गावात 13 जुलैला अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी जितेंद्र शिंदे आणि संतोष भवाळ या नराधमांना अटक करण्यात आली आहे. दोघांना 25 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. संबंधित बातम्या