मुंबई: आजपासून पावसाळी अधिवेशन सुरु होतं आहे. या अधिवेशनात राज्य सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी रणनिती आखली आहे. मंत्रिमंडळ विस्तार, कर्जत बलात्कार प्रकरण, कथित पीए लाच प्रकरणी खडसेंना मिळालेली क्लिन चीट, आंबेडकर भवन हे मुद्दे पावसाळी अधिवेशनात गाजणार असल्याची चिन्ह आहेत.

 

दुसरीकडे संसदेचंही पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बोलवण्यात आलेल्या बैठकीला सर्वपक्षीयांनी हजेरी लावली होती. या अधिवेशनात जीएसटीसह महत्त्वाच्या विधेयक मंजूर करुन घेण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील असणार आहे.

 

राज्यसभेच्या 58 जागांसाठी झालेल्या निवडणुकीनंतर आकड्यांची गणितं बदलली आहेत. त्यामुळेच जीएसटी विधेयक सरकारला आता दृष्टीपथात दिसू लागलं आहे. अरुणाचलमधला आक्रस्ताळेपणा आणि धगधगतं काश्मीरचं खोरं हे दोन मुद्दे सोडले. तर यंदाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांकडे मोठा दारुगोळा नाही.

 

स्मृती इराणींना बाजूला करुन मोदींनी त्या संघर्षालाही शमवलं आहे. त्यामुळे सरकारचं जीएसटी विधेयक हेच अधिवेशनात लक्ष्य आहे.

 

विरोधकांचा चहापानावर बहिष्कार:

 

दरम्यान, पावसाळी अधिवेशनच्या पूर्वसंध्येआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलवलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तर मुख्यमंत्र्यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन विरोधकांच्या आरोपांना चोख उत्तर दिलं.

 

पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांचा मातोश्रीवर डिनर:

 

दरम्यान, पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस मातोश्रीवर दाखल झाले. यावेळी त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत सपत्नीक स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला. वांद्रे पोट निवडणुकीच्या प्रचाराच्यावेळी मुख्यमंत्री मातोश्रीवर स्नेह भोजनासाठी आले होते. त्यानंतर गेल्या दीड वर्षात या दोन्ही नेत्यांमध्ये घरगुती जेवण झालं नव्हतं. आजपासून पावसाळी अधीवेशनाला सुरवात होते आहे. त्याआधी सत्ताधारी म्हणून विरोधकांचा सक्षमपणे सामना करण्याची रणनिती मातोश्रीतल्या डिनर टेबलवर आखल्या गेल्याची शक्यता आहे.