जळगाव : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंना चिमटा काढला आहे. कर्जमाफीसाठी सरकारला पैशांची अडचण असेल तर मुंबई महापालिकेच्या 60 हजार कोटींच्या ठेवीचा वापर करावा आणि त्याचं व्याज सरकारने पालिकेला द्यावा. त्यामुळे शिवसेनेने बँकांसमोर ढोल वाजवून नौटंकी करण्यापेक्षा सरकारला सहकार्य करावं, अशी टीका अजित पवारांनी केली.


“उद्धव ठाकरे यांचे वागणे दुटप्पीपणाचे आहे. त्यांच्यात धमक असेल, तर त्यांनी त्यांच्या ताब्यात असलेल्या महापालिकेकडील 60 हजार कोटी रुपये सरकारला उपलबध करुन द्यावे. नुसते ढोल वाजवून प्रश्न सुटणार नाहीत.”, असे अजित पवार म्हणाले.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने जळगाव येथे आले होते. त्यावेळी विविध विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली.

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

“राज्यातील प्रत्येक गरजू शेतकऱ्याला कर्जमाफीचा फायदा व्हायला हवा. मात्र, शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी सरकारला पैशाची अडचण असावी, असे वाटते. त्यांना पैशांची अडचण असेल तर त्यांनी मुंबई महापालिकेने ठेव म्हणून  ठेवलेले साठ हजार कोटी रुपये सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वापरावे आणि त्याचा व्याज सरकारने मुंबई  महापालिकेला द्यावा.”, असा सल्ला अजित पवार यांनी सरकारला दिला.

शिवसेनेवर टीकास्त्र

 “शिवसेनेने बँकांच्या पुढे ढोल वाजवून नौटंकी करण्यापेक्षा सरकारच्या सोबत बसून या पैशांचा निर्णय घ्यावा. जेणेकरुन त्याचा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी या पैशांचा उपयोग होईल. महापालिकेला देखील व्याज मिळेल आणि शेतकऱ्यांचा खरिपाचा हंगाम वाया जाणार नाही. असा दुहेरी फायदा महापालिकेकडे असलेल्या ठेवीतून होणार असल्याने सेना आणि भाजपने त्यासाठी समोर बसून निर्णय घेऊन हा प्रश्न सोडवायला हवा.”, असेही अजित पवार म्हणाले.

जळगावमध्येच जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, “सेना आणि भाजपचे राज्यात केंद्रात आणि राज्यात युतीचे सरकार आहे, त्यांनी काय चौकशी करायची करावी. कायदा सर्वांना सारखा असल्याने आपण त्याच्या बाहेर नाही.”