नाशिक : राज्यातील सर्वात मोठा जिल्हा अहमदनगरचं विभाजन होणार आहे. नगरचे दोन भाग व्हावेत ही लोकांची भावना आहे आणि येत्या निवडणुकीपूर्वी अहमदनगरचं विभाजन होईल, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी दिली.


नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत राम शिंदे बोलत होते. अहमदनगरचं विभाजन करण्याची मागणी गेल्या 25 वर्षांपासून आहे. प्रशासकीयदृष्ट्या एवढ्या मोठ्या जिल्ह्याचा कारभार हाकणंही अवघड होत असल्यामुळे लवकरच नगरचं विभाजन केलं जाईल, असं राम शिंदे म्हणाले.

अहमदनगर जिल्ह्यात दोन खासदार आणि 12 आमदार आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समित्या एवढा मोठा कारभार प्रशासकीयदृष्ट्या अवघड आहे. गेल्या 25 वर्षांपासून ही मागणी असताना जुन्या सरकारने लोकांच्या भावना लक्षात न घेता या मागणीकडे दुर्लक्ष केलं. मात्र या निवडणुकीपूर्वी नगरचं विभाजन होईल, असं राम शिंदेंनी सांगितलं.