सातारा : साताऱ्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी बसवलेला कबुतराचा पुतळा कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी काढल्याचं प्रकरण आता चांगलंच तापलं आहे. सुरेश खोपडे यांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेऊन विश्वास नांगरे पाटलांवर गंभीर आरोप केले आहेत.


''मुंबईतील 26/11 हल्ल्याला 9 वर्षे पूर्ण झाली तेव्हा एक लेख लिहिला होता. समुद्रामार्गे दहशतवादी मुंबईत येत असल्याची माहिती आयबीने दिली होती. पण त्याकडे दुर्लक्ष का करण्यात आलं, याचा जाब त्या विभागाच्या विश्वास नांगरे पाटील यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना विचारला होता. जेणेकरुन अंतर्गत सुरक्षा आणखी मजबूत करता येईल. मात्र, याचाच राग मनात धरुन मी राज्यभरात विविध ठिकाणी बसवलेले पुतळे काढण्यात येत आहेत,'' असा गंभीर आरोप माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांनी केला.

2000 साली सातारा पोलीस मुख्यालयाबाहेर तत्कालीन पोलीस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी शांततेचं प्रतीक म्हणून कबुतराचा पुतळा बसवला होता. व्हीआयपींच्या गाड्यांना अडथळा हे कारण पुढे करत विश्वास नांगरे पाटील यांच्या आदेशावरून तो काढण्यात आला. पुतळा हटवल्यामुळे जाहीर नाराजी व्यक्त करत सुरेश खोपडे यांनी विश्वास नांगरे पाटील यांच्यावरही निशाणा साधला.

आयपीएस अधिकाऱ्यांमध्येही वर्णभेद : सुरेश खोपडे

वरिष्ठ नोकरशाही ही देश आणि समाजाचे खरे शत्रू आहेत, असा गंभीर आरोप सुरेश खोपडे यांनी केला. ''आयपीएस अधिकाऱ्यांमध्येही वर्णव्यवस्था आहे. इथे असलेले एसपी, आयजी हे थेट आयपीएस आहेत आणि मी डिपार्टमेंट आयपीएस आहे. म्हणजे मी खालच्या स्तराचा आयपीएस आहे. मी केलेली कामं आणि प्रयोग त्यांना लाजीरवणी वाटतात,'' असंही सुरेश खोपडे म्हणाले.

''मागच्या सरकारमध्येही एक मागणी केली होती, तर सक्तीने एक वर्ष घरी बसवलं, पगारही दिला नाही. तंटामुक्ती योजनेच्या वेळी गृहमंत्र्यांच्या विरोधातही भूमिका मांडली. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माझा एन्काऊंटर करण्याची परवानगी मागितली. देशाचे आणि समाजाचे एक नंबरचे शत्रू ही वरिष्ठ नोकरशाही आहे, असा घणाघात सुरेश खोपडे यांनी केला.