अहमदनगर दारुकांडातील तीन फरार आरोपींना नांदेडमधून अटक
एबीपी माझा वेब टीम | 18 Feb 2017 02:59 PM (IST)
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातल्या पांगरमल दारुकांडातील तीन फरार आरोपींना अटक झाली आहे. मोहनशेठ दुग्गल, सोनू दुग्गल आणि शेखर जाधव या तिघांना नांदेडमध्ये अटक करण्यात आली आहे. पांगरमलमध्ये घडलेल्या दारुकांडात तब्बल सात जणांचा बळी गेला आहे. याप्रकरणी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख भीमराव आव्हाड याच्याशिवाय सहा जणांना पोलिसांनी आतापर्यंत बेड्या ठोकल्या आहेत. थेट जिल्हा रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्येच बनावट दारु तयार होत असल्याचं याआधीच उघड झालं होतं. त्यामुळे आता दारुकांडात काय कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कॅन्टीनमधून 12 प्रकारच्या विदेशी दारुच्या बाटल्यांची झाकणं, रिबॉटलिंग साहित्य, इसेन्स कलर असं अनेक साहित्य जप्त करण्यात आलं होतं. शिवाय या कॅन्टीनमधून अनेक आधारकार्ड आणि द्रारिद्र्यरेषेखालील रेशन कार्डचा साठाही उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला. यामागे मोठं टोळकं असू शकतं असा संशय पोलिसांना आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केल्यानंतर ही गंभीर बाब समोर आली. रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टीत तसंच शहराच्या इतर परिसरात ही दारु सर्रास विकली जाते. जेऊर गावात निवडणुकीच्या पार्टीत विषारी दारुमुळे सहा जणांचा मृत्यू झाला. या परिसरात अनेक अवैध धंदे राजरोसपणे सुरु असतात. मात्र जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांचं याकडे साफ दुर्लक्ष असल्याचं दिसतं. जिथे रुग्णांचे प्राण वाचवले जातात, त्याच जिल्हा रुग्णालयाच्या आवारात लोकांचे बळी घेण्याचा हा प्रकार गंभीर आहे.