अहमदनगर: वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून रेल्वेतील कर्मचाऱ्याने रेल्वेसमोर उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. बबलू कुमार असं या कर्मचाऱ्याचं नाव असून, तो गँगमन म्हणून कार्यरत होता. धक्कादायक म्हणजे बबलू कुमारने आत्महत्येपूर्वी वरिष्ठाकडून जाच कसा होतो, हे धायमोकलून रडत व्हिडीओमध्ये सांगितलं.

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात स्वातंत्र्य दिनीच सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. बबलू कुमार हा वांबोरी रेल्वे स्थानकावर गँगमन म्हणून कार्यरत होता. आत्महत्येपूर्वी बबलू कुमारने आपल्याला होणाऱ्या त्रासाचा व्हिडीओ बनवून ठेवला.



मूळचा बिहारचा असलेल्या बबलू कुमारला गेल्या दीड वर्षांपासून एकही सुट्टी मिळाली नव्हती. सातत्याने कारणं देत सुट्टी नाकारली जात असे, तसंच वरिष्ठांकडून शिवीगाळ होत असल्याचं बबलूने व्हिडीओत सांगितलं आहे.

धर्मेंद्रकुमार नावाच्या वरिष्ठाने जाच केल्याचा आरोप बबलू कुमारने केला. युनिट 18 च्या इनचार्जकडे आपण तक्रार केली, मात्र त्याचा काही उपयोग झाला नसल्याचं बबलूने व्हिडीओत म्हटलं आहे.

वरिष्ठ अनेकदा आपल्याला त्रास देत असल्याची तक्रारही त्याने अनेकवेळा केली होती. आपण केलेल्या तक्रारीची दखल घेत नसल्याने आज सकाळी मुंबई- शिर्डी या फास्ट रेल्वेखाली उडी मारत, बबलू कुमारने आपलं आयुष्य संपवलं.

दरम्यान आत्महत्येनंतर कर्मचारी संतापले असून जोपर्यंत वरीष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह जागेवरुन न उचलण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला.  या घटनेने रेल्वे स्थानकावर तणावाची परिस्थिती आहे.