शिर्डी : उत्तर अहमदनगरची जीवनदायिनी असलेल्या निळवंडे धरणाला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या सहा महिन्यांपासून होत असलेल्या पाणीगळतीमुळे लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली आहे.


धरणाच्या सर्व्हिस गेटमधून तब्बल 20 क्युसेक वेगाने प्रत्येक सेकंदाला 300 लीटर पाणी वाया जात आहे. अद्यापही प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावलं उचलली जात नाही.

अकोले तालुक्यात बांधण्यात आलेल्या या धरणाच्या कामाला 45 वर्षं लागली होती. गेल्या वर्षी बांधकाम पूर्ण झालेल्या या धरणाला सहा ते सात महिन्यातच गळती लागल्याने धरणाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलं आहे.

एकीकडे 'पानी फाऊण्डेशन'सारख्या अनेक संस्था पाण्याचा प्रत्येक थेंब कसा साठवता येईल, यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र दुसरीकडे धरणात असलेलं पाणी वाया जात असताना प्रशासनाकडून डोळेझाक केली जात असल्यानं संताप व्यक्त होत आहे.