महाड : रायगडमधल्या महाड एमआयडीसीतील एका कंपनीला भीषण आग लागली आहे. प्रिव्ही असं या कंपनींच नाव आहे. दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास प्रीव्ही कंपनीतील एका हायड्रोजन प्लांटमध्ये स्फोट झाला आणि कंपनीत आग भडकली.
मिळालेल्या माहितीनुसार, मागच्या दीड तासात या कंपनीतून आणखी 20 स्फोटांचे आवाज आले. मात्र हे स्फोट नेमके कशाचे होते याचे तपशील मिळू शकले नाहीत. हे स्फोट होण्याच्या काही वेळ आधीच लंच ब्रेक झाला होता. त्यामुळे सर्व कामगार हे कंपनीच्या बाहेर गेले होते. त्यामुळे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मात्र, ही आग प्रचंड मोठी असल्याने ती आजूबाजूच्या कंपन्यांमध्येही पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे ही आग लवकराच लवकर आटोक्यात आणण्याचं मोठं आव्हान अग्निशमन दलासमोर आहे.
सध्या अग्निशमन दलाचे जवान या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा अटोकाट प्रयत्न करत आहेत. मात्र, आगीनं रौद्र रुप धारण केलं असल्याने ही आग विझवण्यासाठी बराच वेळ लागण्याची शक्यता आहे . सध्या येथील परिसरात धुराचं साम्राज्य बघायला मिळतं आहे.