सांगली : अनेक प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याने किंवा महत्त्वाचे साक्षीदार फितूर झाल्याने आरोपीची निर्दोष सुटका झाल्याचं आपण पाहतो. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील एका हत्या प्रकरणातही असेच महत्त्वाचे साक्षीदार फितूर झाले. पण त्यावेळी सांगली पोलीस दलात कार्यरत असलेली लुसी श्वान ही या घटनेत महत्त्वाची साक्षीदार ठरली. इतकंच नाही, तर तिच्यामुळे हत्या करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा मिळाली आहे.




वाळवा तालुक्यातील वाटेगावमध्ये येथे उसनवार दिलेल्या पैशाच्या वादातून मे 2015 मध्ये एक हत्या झाली. सागर विलास नलवडे (वय 28, रा. वाटेगाव) असं हत्या झालेल्या युवकाचं नाव होतं. सागरने आरोपी शंकर सावंत याच्याकडून 10 हजार रुपये घेतले होते. सावंत हा या पैशाची वारंवार मागणी करत होता. मात्र सागर पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. हा राग मनात धरून आरोपी शंकर सावंत याने त्याला मद्यपान करण्याचा बहाणा करत बरोबर नेलं आणि त्याच्यावर चाकूने हल्ला केला.

या हल्ल्यात सागरच्या पोटावर, तोंडावर आणि कपाळावर वार झाल्याने रक्तस्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर विलास तातोबा नलवडे याने कासेगाव पोलिसात फिर्याद दिली. सरकारी पक्षातर्फे 32 साक्षीदार तपासण्यात आले. या हत्या प्रकरणात कुणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उपलब्ध नव्हता. तसेच जे महत्त्वाचे साक्षीदार होते ते फितूर झाले.



यामध्ये त्यावेळी सांगली पोलीस दलात कार्यरत असलेली लुसी श्वान ही महत्त्वाची साक्षीदार ठरली. पोलीस दलातील लुसीने आपले चालक हवालदार अनिल रजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी शंकर सावंत याची घटनास्थळावरच ओळख पटवली होती.

लुसीला मृताच्या अंगावरील कपडे आणि रक्ताने अर्धवट माखलेल्या चाकूच्या मुठीचा वास देण्यात आल्यावर लुसीने शंकर सावंत याला ओळखलं. केवळ लुसीच्या या कामगिरीने सावंत याला जन्मठेपेची शिक्षा मिळाली.

लुसी आज हयात नाही. पोलीस दलात 10 वर्ष सेवा बजावल्यानंतर 2 जानेवारी 2017 रोजी लुसी सेवानिवृत्त झाली. 8 डिसेंबर 2017 रोजी वृद्धापकाळाने लुसीचा मृत्यू झाला. मात्र 2015 साली लुसीने केलेल्या कामगिरीने आणि त्या कामगिरीला आज आलेल्या यशाने लुसीची पोलीस दलाला पुन्हा एकदा आठवण झाली आहे.