अहमदनगर : एखाद्या गावातील पाण्याची टाकी आणि स्मशानभूमी गायब झाली असं म्हटलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण मंडळी पारनेर तालुक्यातील कुरुंद या गावात हा प्रकार घडला आहे. कुरुंद गावात दलित वस्ती योजनेअंतर्गत बांधण्यात आलेली पाण्याची टाकी आणि स्मशानभूमी गायब झाल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य चेतन उबाळे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पारनेर पोलीस स्टेशन, पंचायत समिती तसंच ग्रामपंचायतकडे तक्रार केली आहे.


गावातील एक लाख लिटर साठवण क्षमतेची जवळपास 49 लाख रुपये खर्चून बनवलेली एक पाण्याची टाकी आणि दीड लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेली स्मशानभूमी गायब झाल्याची तक्रार चेतन उबाळे यांनी केली आहे. कुरुंद गावात भारत निर्माण पाणी योजनेतील पाण्याची टाकी ज्या ठिकाणी बांधण्यात आली होती, ती त्या ठिकाणी नाही. तसेच दलित वस्तीची स्मशानभूमी ज्या गट नंबरमध्ये बांधली आहे, आज रोजी ती देखील त्या गट नंबरमध्ये नाही, अशी तक्रार चेतन उबाळे यांनी केली आहे. 


विशेष म्हणजे या सर्व कामाला कार्यपूर्ती प्रमाणपत्र अधिकाऱ्यांनी दिले आहे. मग जर ही दोन्ही कामे झाल्याचे प्रमाणपत्र संबंधित अधिकाऱ्यांनी दिले असेल तर त्यांनी कामाची पाहणी केली नाही का? पाहणी न करताच त्यांनी असे प्रमाणपत्र कसे दिले? ज्या जागी काम होणे अपेक्षित होते त्या जागी काम न करता जर दुसऱ्या ठिकाणी काम झाले असेल तर त्याला तत्कालीन ग्रामसेवक किंवा इतर अधिकाऱ्यांनी विरोध का केला नाही? किंवा ज्या जागेवर ही कामं झाली असेल त्या जागेबद्दल कोणी हरकत घेतली तर सरकारचा एवढा मोठा निधी वाया जाऊ शकतो याला जबाबदार कोण? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. 


दरम्यान, याबाबत चौकशी करु असं उत्तर पंचायत समिती विस्तार अधिकारी महादेव भोसले यांनी दिलं. तर इतर अधिकारी या विषयावर माध्यमांसमोर बोलणं टाळत आहेत.


विशेष म्हणजे ग्रामपंचायत कार्यालयात या कामांची कोणत्याही प्रकारे नोंद उपलब्ध नाही असं उबाळे यांनी म्हटलं आहे. तसंच या प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाल्याची शक्यता उबाळे यांनी व्यक्त केली आहे. आठ दिवसात ही टाकी आणि स्मशानभूमी शोधून द्यावी असं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे. आठ दिवसात हरवलेली पाण्याची टाकी आणि स्मशानभूमी शोधण्यात आली नाही, तर पंचायत समिती पारनेर या ठिकाणी धरणे आंदोलन करु, असा इशारा कुरूंद गावचे ग्रामपंचायत सदस्य चेतन उबाळे यांनी दिला आहे.