अहमदनगर: मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे, मी करतो तेच बोलतो आणि बोलतो तेच करतो असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. येत्या काळात पाण्यामधून हायड्रोजन वेगळं काढून त्यावर विमान आणि रेल्वे चालवणार असंही ते म्हणाले. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे भाजपाचे जेष्ठ नेते मधुकर पिचड यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमामध्ये बोलताना नितीन गडकरी यांनी हे वक्तव्य केलं.
नितीन गडकरी म्हणाले की, "आजची स्थिती ही गहू स्वस्त तर ब्रेड महाग आणि टोमॅटो स्वस्त तर सॉस महाग अशी आहे. जेव्हा गरज होती तेव्हा उसापासून साखर तयार केली. लोक ऊस लावत आहेत, त्यात नफा आहे. आज आपल्या देशात साखर सरपल्स आहे त्यामुळे येत्या काळात साखरे ऐवजी अन्य पदार्थाकडे वळण्याची गरज आहे."
नितीन गडकरी पुढे म्हणाले की, "येत्या काळात पाण्यामधून हायड्रोजन वेगळं काढून त्यावर विमान आणि रेल्वे चालवणार असल्याचं नितीन गडकरी म्हणाले. अहमदनगरमध्ये पेट्रोलला हद्दपार करा, कार आणि बस इथेनॉलवर चालवा. माझा ट्रॅक्टर बायो सीएनजी वर आहे, आपला शेतकरी अन्नदाता बरोबर ऊर्जादाता बनला पाहिजे."
मागच्या जन्मी जो पाप करतो तो या जन्मी साखर कारखाना काढतो, नाहीतर वर्तमानपत्र चालवतो अशी मिश्किल टिप्पणी नितीन गडकरी यांनी केली. पश्चिम महाराष्ट्र मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांची शाळा आहे तर मराठवाडा फस्ट क्लासमध्ये येणारी शाळा असल्याचंही ते म्हणाले.
रस्ते बांधकामाचे काम करताना माती लागते, तलाव खोदले की त्याची माती रस्त्यांच्या कामासाठी वापरात येते. अशा पद्धतीने मी 36 तलाव बांधले आहेत असं नितीन गडकरी म्हणाले. नितीन गडकरी फुकटात तलाव करायला तयार आहे, नगर जिल्ह्यात 85 टक्के पाणी झाले तर 90 टक्के प्रश्न मिटतील असंही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: