अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्याचे (Ahmednagar) नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर (Punyashlok Ahilya Devi Nagar) करावे अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. त्यामुळे औरंगाबाद पाठोपाठ आता अहमदनगरचेही नामांतर होणार का? याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.


राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव हे अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी हे आहे. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे अवघ्या हिंदूस्थानाच्या प्रेरणास्थान आहेत. जेव्हा मुघल, निजामशाहीत हिंदूसंस्कृतीवर हल्ले होत होते, मंदिरं लुटली आणि तोडली जात होती, त्यावेळेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी हिंदुसंस्कृतीत प्राण फुंकले, त्यांचा जीर्णोद्धार केला. अनेक घाट, बारव बांधले. मंदिरांचे पुनर्निर्माण केलं, स्त्रीयांना सन्मान मिळवून दिला. लोकहितासाठी कुशल प्रशासनाचा वस्तूपाठ त्यांनी घालून दिला.आज जे काही या देशातलं सांस्कृतिक वैभव टिकून आहे त्यात हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा मोठा वाटा आणि वारसा आहे. असं आमदार पडळकर यांनी म्हटलं आहे.






सोबतच अहमदनगरची ओळख करून देताना निजामशाही इतिहास डोकावता कामा नये असंही पडळकर यांनी म्हटलं आहे.त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याचे नाव 'पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर' करावे ही लोकभावना आहे असं त्यांनी म्हटलं आहे. हिंदू राजमाता, हिंदू संस्कृतीच्या जीर्णोद्धारकर्त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला त्या जिल्ह्याचे 'अहमदनगर' नाव बदलून 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर' करण्यात यावे, अशी मागणी पडळकर यांनी पत्रातून केली आहे. 


राज्यातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांचं नामांतर अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव असं करण्यात आलं आहे. या नामांतराला काही पक्षांनी विरोध देखील केला आहे. त्यातच आता आमदार पडळकर यांनी ही मागणी केल्याने नवा संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही.