अहमदनगर : अहमदनगरमधल्या कोपर्डीत बलात्काराला बळी पडलेल्या अल्पवयीन मुलीचं स्मारक बांधण्यात येणार आहे. चिमुरडीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेला 13 जुलै रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे.
या पार्श्वभूमीवर कोपर्डीत श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याचबरोबर पीडितेवर अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणी स्मारक उभारण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. अध्यात्मिक गुरु भैय्यू महाराज यांच्या सर्वोदय परिवाराच्या वतीनं स्मारक बांधण्यात येणार आहे. रविवारी या स्मारकाचं भूमिपूजन करण्यात आलं.
साधारणपणे 50 बाय 50 फूटाचं स्मारक बांधण्याचा प्रस्ताव आहे. स्मारकाच्या मध्यभागी पितळी धातूचा पुतळा बसवण्यात येणार आहे. स्मारकाशेजारीच लिंबाचं झाडही असेल. अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात क्रांतिकारी संघर्षाचं प्रतीक म्हणून हे स्मारक ओळखलं जाणार आहे.
पीडित कुटुंबीयांच्या शेतात हे स्मारक बांधण्यात येत आहे. सहा तारखेपर्यंत बांधकाम पूर्ण होण्याचा अंदाज आहे. तेरा तारखेला श्रद्धांजलीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येनं नागरिक कोपर्डीत दाखल होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोपर्डीत रविवारी नियोजन बैठक पार पडली.